गावशिवार न्यूज | कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आणि त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते. प्रदूषण व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी कोळशापासून इंधन वायू तयार करण्याचा प्रस्ताव केंद्रिय मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे. केंद्राच्या या नवीन निर्णयामुळे आगामी सहा वर्षात सुमारे 10 कोटी टन कोळशापासून गॅस निर्मिती होण्याची शक्यता आहे. (Fuel gas from coal)
केंद्रिय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना कोळशापासून इंधन वायू निर्मितीबद्दलची माहिती दिली. अयोध्येत प्रभू राममंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची पहिलीच बैठक होती. ही बैठक सहस्रकातली एक असल्याचे सांगून अयोध्येतल्या सोहळ्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन बैठकीत करण्यात आले. कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, ते टाळण्यासाठी गॅसनिर्मितीचा पर्याय निवडण्यात आल्याचे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. इंधन वायू निर्मितीकरीता 8.5 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, साधारणपणे सन 2023 पर्यंत 10 कोटी टन कोळशापासून गॅस निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल आहे. तसेच देशात कोळशाची कमतरता नाही असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ओमान सरकारबरोबर माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या भागीदारीच्या समझोता कराराला तसेच डॉमिनिकन रिपब्लिकबरोबर संयुक्त आर्थिक आणि व्यापारविषयक समिती स्थापन करण्याच्या समझोत्याला देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)