Ganja Sheti : राज्यभर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला पोलिसांनी गती दिलेली असताना, शेतांमध्ये चोरीचुपके गांजा लागवड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर आतापर्यंत कायदेशीर कारवाया सुद्धा झाल्या आहेत. मात्र, तुम्हाला विश्वास बसणार नाही घराच्या गच्चीवर एका महाभागाने कुंड्यांमध्ये गांजाची शेती फुलवली होती. पोलिसांनी त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरून गच्चीवरची त्याची गांजाची हायटेक शेती उद्धवस्त केली आहे. शिवाय बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जगन्नाथ वॉर्डातील आकिब शेख सलाम या तरूणाने घराच्या गच्चीवरच गांजाची शेती फुलवल्याची खबर पोलिसांना लागली होती. झटपट पैसे कमावण्यासाठी गांजा शेती हा एक उत्तम पर्याय असल्याची माहिती मिळाल्यानंतर आकिबने गच्चीवर मस्त कुंड्यांमध्ये गांजाची 42 झाडे जगवली होती. खबरीच्या आधारे वर्ध्याचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ.सागर कवडे, उप विभागीय अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारुती मुळक, उपनिरीक्षक रमेश मिश्रा तसेच पोलिस शिपाई प्रवीण देशमुख, सुनील माळनकर, नरेंद्र आरेकर, दीपक हाके, विजय हरणुर, सागर संगोळे यांनी आकिबच्या गच्चीवर छापा टाकला. तेव्हा त्याठिकाणी दोन ते अडीच फूट उंचीची तब्बल 42 गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी मुद्देमालासह आकिबला लगेचच ताब्यात घेतले. शिवाय त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा देखील दाखल केला. दरम्यान, गच्चीवरील गांजाच्या बेकायदेशीर शेतीवर धाड टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाईची वर्धा जिल्ह्यात सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)