गावशिवार न्यूज | महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत 900 रूपये किंवा त्यापेक्षा जास्त असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र गॅस सिलिंडरसाठी आता 450 रूपयांचे अनुदान मिळणार आहे. म्हणजेच इतर राज्यांच्या तुलनेत राजस्थानमधील गॅसची किंमत निम्म्याने कमी होणार आहे.
In Rajasthan, a domestic gas cylinder will get a subsidy of Rs 450
राजस्थानमध्ये भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आता आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दारिद्र्यरेषेखालील आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या महिलांना 450 रूपये इतक्या अनुदानित दराने घरगुती वापराच्या सिलिंडरचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात जास्तीतजास्त 12 अनुदानित गॅस सिलिंडर अनुदानित योजनेतून पुरविण्यात येणार आहेत.
महिलांच्या बँक खात्यात जमा होईल अनुदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास, संकल्पनेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन अनुदानित गॅस सिलिंडर वितरणाचा उपक्रम सुरू केल्याची माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दिली आहे. गॅस सिलिंडरसाठी देण्यात येणारे अनुदान थेट महिला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शर्मा यांनी नमूद केले आहे.