Geographical Indications : राज्यातून पाठविण्यात आलेल्या 18 प्रस्तांवापैकी निम्मे म्हणजे 9 प्रस्तावांना अखेर जीआय मानांकन मिळाले आहे. त्यात लातुरची चिंच, तूर डाळ अन् कोथिंबीर तसेच धाराशीव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा खवा, तुळजापुरची कवडी आणि जालन्याची ज्वारी, पेणच्या गणेशमूर्ती, बदलापूर येथील बाहडोलीची जांभळे यांचा समावेश आहे. जीआय मानांकन मिळाल्याने संबंधित शेतकरी वर्गातून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.
Latur’s tamarind, tur dal and coriander finally got ‘GI’ rating
राज्यातील सर्वच शेतकरी पावसाळी, हिवाळी व उन्हाळी हंगामात कोथिंबीरचे पीक घेतात. मात्र, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या कास्तीच्या कोथिंबिरीला स्वतःचा असा एक खास सुवास आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि इतरही बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये कास्तीची कोथिंबीर हातोहात विकली जाते. विदेशातही येथील कोथिंबीर निर्यात केली जाते. लातूर जिल्ह्यातीलच निलंगा तालुक्यात वसलेल्या बोरसुरी गावाला गेल्यावर तेथील स्वादिष्ट वरण खाऊन बघा एकदा. बोरसुरी गावात वरणाला डाळ म्हटले जाते आणि त्या डाळीत टाकल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मसाल्यामुळे त्याठिकाणच्या वरणाला जीआय मानांकन मिळाले आहे. याशिवाय पानचिंचोली गावच्या सहा ते आठ इंच आकाराच्या चिंचेने जीआय मानांकनाचा बहुमान मिळवला आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे पानचिंचोलीच्या चिंचेला त्यामुळे संपूर्ण जगभर नवी ओळख मिळणार आहे.
कुंथलगिरीचा खवा आता खाणार भाव
धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी भागात दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेल्या पशुपालकांकडून दु्ग्धजन्य पदार्थांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. कुंथलगिरीचा खवा त्यातल्या त्यात राज्यासह देशात विशेष प्रसिद्ध आहे. जीआय मानांकन मिळाल्याने कुंथलगिरीचा खवा आता चांगलाच भाव खाणार आहे. कारण, त्याला देशाच्या बाहेरही ग्राहक मिळणार आहेत. तुळजापुरला गेल्यावर कवड्यांची खास बाजारपेठ दिसून येते. तुळजापुरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक कवड्यांची माळ आवर्जून खरेदी करतात. कवडी विशेषतः देवी देवतांच्या पुजेवेळी वापरली जाते. जीआय मानांकनामुळे तुळजापुरच्या कवडीला देश-विदेशाची कवाडे आता खुली झाली आहेत. याशिवाय जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या टणक ज्वारीला सुद्धा जीआय मानांकन मिळाले आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)