नागपूरमध्येही 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे होणार आयोजन

गावशिवार न्यूज | मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर राज्य शासनाने 16 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नागपूर येथेही ‘महालक्ष्मी सरस’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास नागपूरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी आशा राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. (Girish Mahajan)

महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर यंदा 26 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. दोन आठवड्यांच्या या प्रदर्शानाला नागरिकांनी यंदाही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे महिला बचतगटांनी सुमारे 25 कोटी रूपयांपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल केली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात राज्यभरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या भरतकामाच्या साड्या, बांबुच्या वस्तू, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरिअल, चादरी, कार्पेट, पडदे तसेच घरगुती मसाले, पापड, कुरड्या आणि बऱ्याच खाद्य पदार्थांची दालने होती. यंदाच्या या प्रदर्शनाला राज्यातूनच नव्हे तर देशातून व विदेशातून भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. शाळांच्या विद्यार्थ्यांनीही शैक्षणिक सहली काढून महालक्ष्मी सरसला भेट दिली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून विशेषतः मुंबई शहरातील नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला, जो शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता. मुंबईच्या धर्तीवर नागपुरमध्येही आता महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. ज्यामुळे राज्यातील महिला बचतगटांना आणखी नवी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊ शकणार आहे.

WhatsApp Group
Previous articleशुक्रवार (ता. 09 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleराज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी नऊनंतर ‘या’ दिवसापासून भरतील