शासन राज्यातील लहान शेतकऱ्यांसाठी ‘गाव तिथे गोदाम’ योजना राबविण्याच्या तयारीत

गावशिवार न्यूज | राज्यातील लहान शेतकऱ्यांना शेतीमाल साठविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी गोदामे निर्माण करण्यासाठी शासनाने आता पाऊल उचलले आहे आणि त्याकरीता लवकरच ‘गाव तिथे गोदाम’ योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी शासनाकडून एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. त्यासंदर्भात शासन निर्णय हा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. (Government Resolution)

राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषी विषयक साधन सामग्री साठविण्यास मदत करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधांसह साठवण क्षमता निर्माण करणे, कृषी प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, वित्त पुरवठा व विपणन कर्जाची सुविधा उपलब्ध करून अपव्यय व बिघाड रोखणे, गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतमालाच्या संदर्भात छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, कृषी गोदामांच्या बांधकामात खासगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनरूज्जीवन करणे, अशा बऱ्याच उद्देशांनी ‘गाव तिथे गोदाम’ योजना शासन कार्यान्वित करीत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत अभ्यास समितीने यापूर्वीच शासनास अहवाल सादर केला आहे. त्याअनुषंगाने ‘गाव तिथे गोदाम’ योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ही समिती ‘गाव तिथे गोदाम’ योजनेचे प्रारूप तयार करून शासनाला दोन महिन्यात सादर करेल.

‘गाव तिथे गोदाम’ योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी शासनाने गठीत केलेली समिती
● अध्यक्ष- सहसचिव (पणन),
● सदस्य- अवर सचिव (वित्त विभाग), अवर सचिव (नियोजन विभाग), अवर सचिव (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग), सहसंचालक (पणन संचालनालय, पुणे), सरव्यवस्थापक (महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबई), सरव्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे), श्री. देविदास माणिकराव पालोदेकर (राज्य पणन सल्लागार), ॲड. नीलेश हेलोंडे (संयोजक, गाव तिथे गोदाम)
● सदस्य सचिव- कक्ष अधिकारी (11-स)

WhatsApp Group
Previous articleअचूक हवामान अंदाजासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर होणार
Next articleमंगळवारी (16 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव