Government Resolutions : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री.पाशा पटेल यांना मंत्रिपदाचा दर्जा

Government Resolutions : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालास उत्पादन खर्चाच्या तुलनेत किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतीमाल खरेदी करता यावा, या उद्देशाने राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाच्या अध्यक्षांना आता मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला असून, शासनाने त्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. या पदावर सध्या श्री.सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल हे कार्यरत आहेत.

Ministerial status to Mr. Pasha Patel, Chairman, State Agricultural Value Commission

शेतकरी व ग्राहक या दोघांचे हीत साधण्यासाठी ता.23/04/2015 च्या शासन निर्णयान्वये राज्य शेतमाल भाव समितीचे रुपांतर राज्य कृषी मूल्य आयोगात करण्यात आले आहे. याशिवाय 18 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयान्वये श्री.पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आलेली जबाबदारी आणि आयोगाच्या कामकाजाचे स्वरूप तसेच अध्यक्षांना केंद्रिय कृषी मूल्य व किंमत आयोगामध्ये करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधीत्व लक्षात घेता आयोगाच्या अध्यक्ष पदाला मंत्री पदाच्या समकक्ष दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास शासनाने आता मान्यता दिली असून, श्री.पाशा पटेल यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. अन्य मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधाही त्यांना शासनाकडून यापुढे दिल्या जाणार आहेत. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अन्य सदस्यांपैकी शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांना आधीच नियमाप्रमाणे वेतन व इतर भत्ते दिले जातात, त्यामुळे त्यांना स्वतंत्र भत्ते मिळणार नाहीत. मात्र, अशासकीय सदस्यांना शासनाच्या स्थायी आदेशानुसार देण्यात येणारे सर्व प्रकारचे भत्ते अनुज्ञेय राहतील. राज्य कृषी मूल्य आयोगाची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या आयोगाच्या अध्यक्षांना कार्यकक्षेनुसार कामकाजाची दक्षता घ्यावी लागणार आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अहवाल सुद्धा वेळोवेळी शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी गोपनियतेचे पालन करून सादर करावे लागणार आहेत.

WhatsApp Group
Previous articleGovernment Resolutions : शासनाकडून हिरव्या व कोरड्या वैरणीची तूट भरून काढण्यासाठी कृती दलाची स्थापना
Next articleBanana Rate : अबब…मुंबई बाजार समितीमध्ये केळीला 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव