गावशिवार न्यूज | मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज गुरुवारी (ता.04) घेतला. अर्थात, प्रतिलिटर अनुदान सहकारी संघांना दुधाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनाच देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वतः दूध विक्री करणाऱ्या किंवा खासगी संघांना दुध पुरवणारे शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. (Government Resoutions)
नोव्हेंबर 2023 मधील आकडेवारीनुसार राज्यात सहकारी दूध संघांमार्फत दररोज 43.69 लाख लिटर दूध संकलीत करण्यात येते. शासनाकडून 5 रुपये प्रति लिटरअनुदानाप्रमाणे 2 महिन्यांसाठी तब्बल 135 कोटी 44 लाख इतके अनुदान आवश्यक असेल. सदरची योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात त्यासंबधी अधिकृत निर्णय मात्र घेतला नव्हता. अखेर गुरुवारी (ता.04 जानेवारी) मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
बँक खात्यावर जमा होईल अनुदानाची रक्कम
सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना 3.2 फॅट व 8.3 टक्के एसएनएफ दर्जाच्या दुधाला किमान 29 रूपये लिटर खरेदीदर देणे बंधनकारक असेल. सदरचे पेमेंट संबंधित दूध उत्पादकाच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा करावे लागेल. त्यानंतर शासनाकडून मंजूर असलेले प्रतिलिटर 5 रूपयांचे अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जाईल. जानेवारी ते फेब्रुवारी 2024 कालावधीसाठी योजना अंमलात राहणार आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)