राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 112 कोटी रू. निधी मंजूर

Government Scheme : शेतकऱ्यांना यांत्रिकी शेतीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सन 2023/24 मधील अंमलबजावणीसाठी सुमारे 112 कोटी 13 लाख रूपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासंदर्भात घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सदरचा निधी कृषी आयुक्तांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत सुद्धा करण्यात आला आहे.

112 crores for State Sponsored Agricultural Mechanization Scheme. Funding approved

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून महा-डीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेंतर्गत प्राप्त अर्जांमधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थींना अनुदानाचे वाटप करण्यात येते. या योजनेला शासन निर्णयान्वये 97 कोटी 86 लाख रूपयांचा निधी चालू आर्थिक वर्षामध्ये यापूर्वीच वितरीत करण्यात आला होता. त्यानंतर आता कृषी संचालकांनी पत्रान्वये केलेल्या विनंतीनुसार सुमारे 112 कोटी 13 लाख रूपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने घेतला आहे.

■ सदर योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा 1.25 लाख रूपये यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपात वितरीत करण्यात येणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40 टक्के किंवा 1 लाख रूपये यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.
■ शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थींनाच वितरीत करण्यात येणार आहे.
■ लाभार्थी निवडीबाबतची सोडत MAHADBT पोर्टलवरून विहीत कार्य पद्धतीचा अवलंब करून काढण्यात येईल. तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थींना महा-डीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बॅक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारेच जमा केली जाईल.

WhatsApp Group
Previous articleउद्या सोमवारी (ता.11 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleउद्या मंगळवारी (ता.12 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव