‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 41 कोटींचा निधी मंजूर

Government Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजना-कॅफेटेरियाच्या प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याचे 24.59 कोटी रूपये आणि राज्य हिश्श्याचे 16.39 कोटी रूपये, अशा एकूण सुमारे 40 कोटी 98 लाख रूपयांच्या निधीला आज मंगळवारी (ता.19) शासनाने मंजुरी दिली. कृषी आयुक्तांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर सदरचा निधी वितरीत करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

41 Crores sanctioned for general category under ‘Per Drop More Crop’ scheme

सन 2015/16 पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना-कॅफेटेरिया योजनेंतर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मंजुरी समितीने (वार्षिक कृती आराखडा आधारीत) 17 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत प्रति थेंब अधिक घटकाकरीता सुमारे 509.98 कोटी रूपये निधीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता दिली होती. त्यानुसार 11 आॅगस्ट 2023 च्या शासन निर्णयान्वये या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी 509.98 कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देऊन योजनेसाठी पहिल्या हप्त्याचा 80.48 कोटी रूपये निधी वितरीत करण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्र हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून 24.59 कोटी रूपये आणि त्या समरूप राज्य हिश्श्याचे 16.39 कोटी रूपये, असा एकूण 40.98 कोटी रूपये निधी सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अशी होणार योजनेच्या लाभार्थींची निवड

सदर योजनेच्या लाभार्थींची निवड ही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि लाभार्थींना अनुदानाचे वाटप आधार संलग्न बँक खात्यावर करण्याकरीता सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीचा वापर केला जाणार आहे. शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करताना राष्ट्रीय कृषी विकास योजना-कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

WhatsApp Group
Previous articleउद्या बुधवारी (ता. 20 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleशासन प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक यंत्र बसविणार : कृषीमंत्री धनंजय मुंडे