गावशिवार न्यूज | राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविली जाते. त्याअंतर्गत शासनाने वैयक्तिक शेततळ्यांसाठी सुमारे 40 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. (Government Scheme)
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानासोबतच वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरीतगृह उभारणी, शेडनेट हाऊस उभारणी या घटकांकरीता अनुदान वितरीत करण्यात येते. वित्त विभागाच्या 12 एप्रिल 2023 च्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 70 टक्के निधीच्या मर्यादेत सुमारे 350 कोटी रूपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरीता सन 2023/24 मध्ये अर्थसंकल्पीय अंदाज, वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर एकूण 100 कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच वितरीत झालेला आहे. त्यानंतर आता वैयक्तिक शेततळ्यांसाठी सुमारे 40 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदरचा निधी राज्याच्या कृषी आयुक्तांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत देखील झाला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महा डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, लाभार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा होणार आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)