वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी तयार राहावे – राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais : वाढती लोकसंख्या, सातत्याने कमी होत असलेले कृषिक्षेत्र व वातावरणातील तीव्र बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांना आगामी काळातील आव्हानांसाठी तयार राहावे लागेल तसेच वातावरण बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 38 वा दीक्षान्त समारंभ नुकताच पार पडला. त्याप्रसंगी राजभवनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे स्नातकांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. देशात कुशल मनुष्यबळ आहे व लोकांना पारंपरिक शेतीचे ज्ञान आहे. या क्षमतांचा वापर करुन कृषि स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनवावे व त्याहीपुढे जाऊन देशाला जगासाठी अन्नधान्याचे कोठार बनवावे, असेही आवाहन राज्यपालांनी केले. मागील दहा वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, त्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी, कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत असे सांगून राज्यात फलोत्पादन व फुलशेती उद्योगाला तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्टार्टअप्स सुरु करण्यास बराच वाव असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी नमूद केले.

शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि संशोधनाद्वारे वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

WhatsApp Group
Previous articleगुरूवार (ता. 15 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleराज्यात ग्रामसडक योजनेतून 7 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते होणार, ग्रामविकास मंत्र्यांचा पाठपुरावा