Govt Scheme : रेशीम शेती करण्यास इच्छुक लाभार्थींना तुती लागवडीसह शेड उभारणीसाठी सुमारे 3 लाख 97 हजार रूपयांचे अनुदान सोबतच कृषी विज्ञान केंद्राकडून शास्त्रोक्त प्रशिक्षणाची सोय राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले असून, नोंदणीसाठी 20 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे.
4 lakhs subsidy to farmers for sericulture
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत रेशीम शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने तुती लागवडीकरीता सुमारे 2 लाख 97 हजार रूपयांचे अनुदान मिळत होते. त्यात आता 1 लाख रूपयांची वाढ करण्यात आल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना यापुढे 3 लाख 97 हजार रूपये अनुदान मिळू शकणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्रात तुती लागवडीसह कीटक संगोपनाचे रितसर प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे प्रशिक्षण देऊन कृषी विज्ञान केंद्राने अनेक ठिकाणी तुती लागवड वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. वास्तविक नंदुरबार जिल्ह्यात रेशीम विकास अधिकारी कार्यालय नाही. त्यामुळे नाशिक येथील रेशीम विकास संचालनालय हे नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्राची मदत घेऊनच रेशीम विकास कार्यक्रम राबवित असते. यंदाही रेशीम शेती करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना 20 डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. प्रतिएकरी 500 रूपये नोंदणी शूल्क असले तरी टसर तुती लागवडीसाठी कोणतेही नोंदणी शूल्क लागणार नाही.
या बाबींसाठी शेतकरी खर्च करू शकतात 4 लाखांचे अनुदान
नंदुरबार जिल्ह्यासाठी रेशीम शेतीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला सुमारे 4 लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यातून कीटक संगोपणगृहासाठी शेड देखील उभारता येणार आहे. तुती लागवडीनंतर रेशीम कोषांचे उत्पादन हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना आवश्यक ते साहित्य तसेच वीज बिलासाठीही अनुदानातून खर्च करता येतो. याशिवाय रेशीम कोषांच्या उत्पादन सुरू होईपर्यंत मजुरीसाठीही अनुदानातून तरतूद करता येते. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन रेशीम संचालनालयाने केले आहे.