गावशिवार न्यूज | अवकाळी पाऊस व सततच्या ढगाळ वातावरणामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामावर विपरित परिणाम झाला आहे. अपेक्षित थंडीअभावी पुरेसा मोहोर न फुटल्याने आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे. अशा या परिस्थितीत पुण्यात तुरळक प्रमाणात हापूस आंब्याची आवक सुरू झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातून आवक झालेल्या पाच डझनाच्या पहिल्या पेटीला मुहुर्तालाच सुमारे 23 हजार रूपयांचा दर मिळाला आहे. (Hapus Mango)
मोहोर कमी फुटल्याने यंदाच्या हंगामात हापूस आंब्याची सुरुवातीच्या काळात आवक तशी कमीच राहणार आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून हापूसची बाजारातील आवक वाढण्यास सुरूवात होईल. त्यानंतर साधारण एप्रिल-मे महिन्यापर्यंत टप्प्याटप्याने हापूसची आवक वाढत जाईल. अवकाळी पावसाचे वातावरण निवळल्यानंतर खऱ्या अर्थाने थंडीचा कडाका वाढेल आणि त्यामुळे हापूस आंब्याचे चांगले उत्पादन मिळण्यास सुरूवात होऊ शकेल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानंतरच हापूस आंब्यांचे दर आवाक्यात येऊ शकणार आहेत. तोपर्यंत ग्राहकांना हापूस आंब्याच्या खरेदीसाठी थोडे जास्तच पैसे मोजावे लागणार आहेत.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)