शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष 2024 या कारणांमुळे असू शकेल दिलासादायक

Indian Farmer : अनियमित पावसामुळे शेती उत्पादनात झालेली घट तसेच अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे झालेले पिकांचे नुकसान, रोग व कीडींचा प्रादुर्भाव, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, शेतीमालाचे पडलेले दर, मजूर टंचाई आदी बऱ्याच कारणांनी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसाठी 2023 हे वर्ष खूपच निराशेत गेले. अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन वर्षात काही विशेष उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

New Year 2024 may be comforting for farmers due to these reasons

लोकसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन वर्षाची सुरूवात झाल्यानंतर कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार लाभाच्या काही योजनांना भरीव निधी देण्याची चिन्हे आहेत. प्राप्त माहितीनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना ठराविक कालावधीनंतर काही प्रमाणात रक्कम देण्याची सोय असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा आणखी विस्तार करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे वृत्त आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार सध्या वर्षभरात सुमारे 6 हजार रुपयांची रक्कम देते. नवीन वर्षात सदरची रक्कम 9 हजार रूपयांपर्यंत वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

अर्थसंकल्पात 2 लाख कोटींची होऊ शकते भरीव तरतूद

केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते आणि त्यासाठी केंद्राच्या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद दरवर्षी केली जाते. सन 2023 मध्येही केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी 1.44 लाख कोटी रूपयांची तरतूद केली होती. त्या तुलनेत नवीन वर्षात म्हणजे सन 2024 मध्ये केंद्राकडून कृषी क्षेत्राच्या विकासासाठीच्या तरतुदीत आणखी वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार हे 2024/25 च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सुमारे 2 लाख कोटी रूपयांची तरतूद करू शकते. असे झाल्यास 2023 च्या मानाने 2024 वर्षाची आर्थिक तरतूद ही जवळपास 39 टक्के अधिक असेल. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक योजना तसेच कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहील.

पीकविमा योजनेची व्याप्ती वाढणार ?

याशिवाय शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, तापमानातील चढउतार आदी नैसर्गिक घटकांपासून होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पीकविमा योजनेची व्याप्ती नवीन वर्षात वाढविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर दिलासा मिळू शकेल.

WhatsApp Group
Previous articleगोंदियात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, अन्यत्र तुरळक थंडी
Next articleसोमवारी (01 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव