जळगावच्या जैन हिल्सवर अवतरली कृषीची पंढरी, लाखो वारकरी शेतकरी सहभागी

Jain Hitech Agriculture Festival : जळगाव येथील जैन हिल्सवर सध्या हायटेक शेतीचा नवा हुंकार, या संकल्पनेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण अशा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीशी संबंधित आधुनिक प्रयोग तसेच संशोधन अगदी जवळून बघण्याची संधी त्यानिमित्ताने शेतकऱ्यांना मिळाली आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत कृषी महोत्सव सुरू राहणार असून, शेतकऱ्यांना त्याद्वारे हायटेक शेतीचा मूलमंत्र मिळणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने जैन हिल्सवर कृषीची पंढरी अवतरली असून, लाखो वारकरी शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत.

Pandhari of agriculture descended on Jain Hills of Jalgaon, lakhs of Varkari farmers participated

जैन इरिगेशनने शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी उद्योग समुहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उपलब्ध करून दिली आहे. 15 जानेवारी 2024 पर्यंत शेतकऱ्यांना या महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शोधता येईल. कृषीक्षेत्रातील नव्याने विकसीत झालेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सदरचा उपक्रम राबविला जात असून, विविध पिकांची प्रात्यक्षिके जैनच्या कृषी संशोधन, विकास व प्रात्यक्षिक केंद्रावर उभी केली आहेत. हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात गादीवाफ्यावर ठिबक सिंचन संच बसवून एक डोळा पद्धतीने ऊसाची लागवड, क्रॉप कव्हरसह क्रॉप कुलिंग यंत्रणा, तापमान वाढीवर नियंत्रणासाठी मिस्टर स्प्रिंकलर यंत्रणा, कापूस पिकात ठिबक मल्चिंग आणि गादीवाफ्याचा त्रिवेणी संगम पाहता येईल. तसेच आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, मोसंबी, संत्रा या फळ झाडांची अतिसघन पद्धतीने गादीवाफ्यावर ठिबक संचावर केलेली लागवड बघता येईल. हवामान बदलाच्या संकटावरील उपाय म्हणून शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणात फळबागांची शेती किती गरजेची आहे, हे देखील अनुभवता येईल. जैन हिल्सवर शेडनेट व इनसेक्टर नेटमध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा यांची केलेली लागवड पाहायला मिळेल. याशिवाय अवकाळी पाऊस, गारपीट यापासून बचाव व्हावा म्हणून शेडनेटमध्ये ग्रैन्डनैन व्हरायटी केळीची लागवड, गादीवाफा, दोन ठिबकच्या नळ्या आणि मल्चिंग असलेल्या बिगर हंगामी या केळीला पावणे सहा महिन्यात सर्व झाडांना घड लगडले आहेत. बागेचे फ्रूट केअर मॅनेजमेंट कशी करता येते हे अभ्यासता येईल. मोकळ्या शेतात ग्रॅन्डनैन बरोबरच नेंद्रन, पूवन, बंथल व रेड बनाना या जातींची लागवडही पाहता येईल. ठिबक, गादीवाफा व मल्चिंगवर पांढऱ्या व लाल रंगाच्या कांद्याच्या 15 जाती, लसणच्याही 10 जाती, हळदीच्या 19 जातींसह पपईच्या पाच जातींची लागवड कृषी महोत्सवात अभ्यासता येईल. पपईमध्ये हळद व आले ही आंतरपीके घेता येतील, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण होईल. पॉलिमल्च करून गादीवाफ्यावर आधार देऊन व आधार न देता अशा दोन्ही पद्धतीने टोमॅटो व मिरचीची शेती अभ्यासता येईल.

WhatsApp Group
Previous articleराज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध होणार : देवेंद्र फडणवीस
Next articleविदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात थंडीचा कडाका वाढला