Jain Irrigation : जळगाव येथील जैन इरिगेशनला हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान

Jain Irrigation : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त जळगाव येथील जैन इरिगेशनला हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कर्नाटकचे मंत्री एच.के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्वज्ञान जपणारे माजी आमदार उल्हासदादा पवार तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूरचे आमदार पी.एन.पाटील यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे मानकरी असलेल्या तिन्ही मान्यवरांना शाल, सन्मानपत्र, 1 लाखाचा धनादेश, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अशोक जैन यांच्याकडून स्व.अण्णासाहेब शिंदे यांच्या कार्याचा गौरवोल्लेख

सत्कारास उत्तर देताना अशोक जैन यांनी सांगितले की, आमच्या जैन इरिगेशन कंपनीला पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारून प्रस्तुत पुरस्कार आमच्या जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, आमचे परमपूज्य पिताजी श्रद्धेय भवरलालजी जैन आणि त्यांच्या समवेत परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना अर्पण करतो. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे, आमचे वडील भवरलालजी हे तिघेही शेतकरी कुटुंबात जन्मले आणि तिघांनीही कृषी क्षेत्रातील कामकाजावर आधारित उद्योगक्षेत्रात काम करून शेतकऱ्यांच्या कल्याणाची, प्रगतीची, उन्नतीची चिंता वाहून त्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आणि आमच्या वडिलांनी शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी केली तर अण्णासाहेबांनी केंद्रात 15 वर्ष शेती खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळून या देशाच्या कृषी क्षेत्राला धोरणात्मक वळण लावण्याचा प्रयत्न केला आणि वैचारिक मार्गदर्शनही केले. स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे आणि आमच्या वडिलांमधील आणखी एक साम्य सांगायचे म्हणजे दोघेही कायद्याचे शिक्षण घेतलेले पदवीधर म्हणजे वकील होते. आण्णासाहेबांनी वकिलीची प्रॅक्टिस करीत करीत आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनानुसार काँग्रेसमध्ये प्रवेश करून केंद्रात मंत्रीपद सांभाळले आणि आमच्या वडिलांनी मातृप्रेरणेतून उद्योगाचा शुभारंभ केला. घरातून मिळालेल्या सात हजार रुपयातून उद्योगाची सुरुवात झाली. केरोसीन विक्रीने प्रारंभ झाला. भूमिपुत्रांच्या कल्याणाचा ध्यास घेऊन, श्रमप्रतिष्ठेचा अंगीकार करून, आमच्या वडिलांनी आदर्श कार्यसंस्कृतीचा पाया रचला. 65 एजन्सीतून उद्योजकीय कार्यविश्व समृद्ध होत गेलं. कंपनीचे स्वतःचे कारखाने, प्रकल्प, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानमान्यतेपर्यंत पोहचले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जैन इरिगेशनकडून 11 लाखांची देणगी जाहीर

शेती आणि शेतकऱ्यांच्या अजोड बांधिलकीसाठी जगभर 30 कारखाने, 146 कार्यालये आणि डेपो आहेत. 11000 वितरकांच्या जाळ्यासह 12000 हून अधिक सहकारी आहेत. सध्या वार्षिक 7900 कोटीहून अधिक उलाढाल असलेली जैन इरिगेशन ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. आजमितीस जगात कृषी पाईंपासहित ठिबक सिंचन उत्पादनात प्रथम, केळी आणि डाळिंबाच्या टिश्यू कल्चर रोप निर्मितीत प्रथम, आंबा फळप्रक्रियेतही प्रथम, कांदा आणि भाजीपाला प्रक्रियेसाठी दुसऱ्या स्थानी आहे. पुरस्कार आणि सन्मान या संदर्भात अभिमानाने सांगायचं तर… आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय असे एकूण 328 पुरस्कारांनी कंपनी सन्मानित झाली आहे. या पुरस्काराची एक लाख रक्कम न स्वीकारता त्यात जैन इरिगेशन सिस्टिम्सच्या वतीने 10 लाख असे एकूण 11 लाख रुपये बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देण्याचे अशोक जैन जाहीर केले.

WhatsApp Group
Previous articleBanana Market Rate : सोमवारी (08 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleMahalaxmi Saras : महालक्ष्मी सरसमध्ये महिला बचतगटांनी केली सुमारे 25 कोटी रूपयांची उलाढाल