जळगाव जिल्ह्यात 27 नवीन रूग्णवाहिका दाखल होणार, पालकमंत्र्यांची मंजुरी

Jalgaon Breaking News : जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 19 रूग्णवाहिका खरेदीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली आहे. मागील महिन्यात ग्रामीण रूग्णालयांसाठी मंजूर केलेल्या 08 रूग्णवाहिका व आता प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या 19 रूग्णवाहिका, अशा एकूण 27 रूग्णवाहिका जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत दाखल होतील. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

27 new ambulances will be introduced in Jalgaon district, approved by the guardian minister

जिल्हा वार्षिक योजना 2023/24 (सर्वसाधारण) निधीच्या माध्यमातून रूग्णवाहिका खरेदी करण्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जानवे (ता.अमळनेर), तामसवाडी (ता.पारोळा), लोंढे, तरवाडे, खेडगाव (ता.चाळीसगाव), वरखेडी, लोहटार (ता.पाचोरा), कठोरा, वराडसीम, पिंपळगाव (ता.भुसावळ), अंतुर्ली (ता.मुक्ताईनगर), भालोद, सावखेडा (ता.यावल), नशिराबाद (ता.जळगाव), भालोद (ता.यावल), गारखेडा, वाकडी (ता.जामनेर), चांदसर, पाळधी (ता.धरणगाव) या गावांसाठी 19 नवीन रूग्णवाहिकांना पालकमंत्र्यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. लवकरच याबाबत तांत्रिक मंजुरीसाठी नाशिक उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन दोन दिवसांत मान्यता घेतली जाईल. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येऊन फेब्रुवारी 2024 पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन अद्यावत रूग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी दिली आहे.

जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना 08 नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णवाहिका खरेदीच्या प्रस्तावास आरोग्य सेवा आयुक्तांनी एका दिवसातच तांत्रिक मान्यता दिली होती. या रूग्णवाहिकांची सध्या टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जानेवारी 2024 पर्यंत या नवीन रूग्णवाहिका ग्रामीण रूग्णालयात रूग्णसेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजना 2023/24 अंतर्गत जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालय व त्यांच्या अधिनस्त 7 ग्रामीण रूग्णालयांमध्ये न्हावी (यावल) अमळगांव (अमळनेर), मेहुणबारे (चाळीसगांव), पिंपळगांव हरेश्वर (पाचोरा), बोदवड, एरंडोल, भडगांव या रुग्णालयांसाठी प्रत्येकी एक (रुपये 18,06,300/- प्रति रुग्णवाहिकाप्रमाणे) अशा एकूण 08 पेशंट ट्रान्सपोर्ट टाईप बी एसी रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यातील 1049 घरकुलांसाठी सुमारे 13 कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी
Next articleदुधातील भेसळ रोखण्यासाठी दोषींना फाशी देण्याची तरतूद असलेला कायदा येणार