Jalgaon Crime News : वावडदा शिवारातील शेताची राखणदारी करणाऱ्या मजुराचा निर्घूण खून

Jalgaon Crime News : जळगाव तालुक्यात वावडदा शिवारातील एका शेताची रात्री राखणदारी करणाऱ्या मजुराचा निर्घूण खून करून चोरट्यांनी रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना बुधवारी (ता.15 नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder of a farm laborer in Vavadada Shivar

बिलवाडी येथील मूळ रहिवासी असलेले शेतकरी ईश्वर मन्साराम पाटील यांची वावडदा शिवारात म्हसावद रस्त्याला लागूनच शेती आहे. त्याठिकाणी मंगळवारी (ता.14) रात्री शेतीमालाची व पशुधनाची राखणदारी करण्याच्या उद्देशाने बिलवाडी येथील रहिवासी मजूर पांडुरंग पंडित पाटील (वय 52) हे झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतकरी पाटील यांचा घटनास्थळी उभा केलेला ट्रॅक्टर चोरून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाजुलाच झोपलेले मजूर पांडुरंग पाटील यांना जाग आली आणि त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, चोरट्यांनी ट्रॅक्टरचा डाबर त्यांच्या डोक्यात घातला. वर्मी घाव लागल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पांडुरंग पाटील जागीच मृत्युमुखी पडले. दरम्यान, चोरट्यांनी मजुराचा जीव घेतल्यानंतर रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर म्हसावद गावाकडे पळवून नेले. बुधवारी सकाळी शेतमालकाचा मुलगा राजेंद्र पाटील हा गाईंचे दूध काढण्यासाठी शेतावर पोहोचल्यावर त्यास मजुराचा खून झाल्याचे व ट्रॅक्टर शेतातून गायब झाल्याचे दिसून आले.

चोरलेले ट्रॅक्टर खडके फाट्यावर सापडले

घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, बिलवाडीच्या पोलिस पाटील सुवर्णा उंबरे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी लागलीच जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चोरट्यांनी मजुराचा खून करून पळवून नेलेले ट्रॅक्टर एरंडोल तालुक्यातील खडके शिवारात बेवारस स्थितीत आढळून आले. सदर घटनेमुळे वावडदा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

WhatsApp Group
Previous articleJalgaon Crime News : सुटीच्या दिवशी पाच लाखांची लाच घेणारे दोन्ही अधिकारी अडकले जाळ्यात
Next articleBanana Rate : उद्या गुरूवारी (ता.16 नोव्हेंबर) असे असतील केळीचे बाजारभाव