Jalgaon Crime News : जिल्ह्यातील वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला असला, तरी निर्ढावलेले गुन्हेगार कोणालाच जुमानत नसल्याचे आढळले आहे. रविवारी (ता.19) अमळनेर तालुक्यातील नांद्री ते दहिवद रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पथकातील एका तलाठ्याला वाळुने भरलेल्या ट्र्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला. संबंधितांवर पोलिसांत विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत.
रणाईचे (ता.अमळनेर) येथील तलाठी संदिप रामदास शिंदे तसेच हेडावे भागाचे मंडळ अधिकारी योगेश रमेश पाटील, नंदगावचे तलाठी प्रकाश बारकू पाटील, डांगर बुद्रुकचे तलाठी मधुकर राजधर पाटील यांचे संयुक्त पथक अमळनेर तालुक्यातील गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी खासगी वाहनाने रविवारी (ता.19) सकाळी 05.00 वाजता पातोंडा, दहिवद शिवारात गस्त घालत होते. साधारण 06.00 वाजता पथकाला नांद्री ते दहिवद रस्त्यावर एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ट्राॅलीसह दहिवद गावाकडे येताना दिसले. पथकाने चेकिंग केल्यानंतर ट्राॅलीमध्ये एक ब्रास वाळू भरलेली आढळली. संबंधिताला नाव विचारले असता त्याने योगेश संतोष पाटील असे नाव सांगितले. अधिक चौकशी केल्यावर त्याच्याजवळ वाळू वाहतुकीचा कोणताच परवाना नव्हता, शिवाय ट्रॅक्टर विना क्रमांकाचे होते. त्यामुळे पथकाने त्यास ताब्यातील ट्रॅक्टर अमळनेर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी घेऊन चालण्यास सांगितले. परंतु, चालक योगेश पाटील हा पथकातील तलाठ्यांना शिवीगाळ करून तुम्हाला मारण्यासाठी लोक घेऊन येतो, असे सांगून पळून गेला.
3 लाख 35 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, तलाठी संदिप शिंदे हे स्वतः ट्रॅक्टरवर चढून ट्रॅक्टरचा इंजिन व चेसीज नंबर नोट करत असताना पळून गेलेला ट्रॅक्टरचा चालक योगेश पाटील तसेच भूषण देवरे (रा.पातोंडा) आणि अन्य 25 ते 30 वयोगटाचे दोन तरूण, असे चारजण दोन मोटारसायकलींवर घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी पथकातील तलाठ्यांना मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तलाठी संदिप शिंदे हे ट्रॅक्टरवर उभे असताना भूषण देवरे याने एका सहकाऱ्याच्या मदतीने त्यांना खाली ओढले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आज याला जीवंत सोडायचे नाही, असे बोलून आरोपी योगेश पाटील याने ट्रॅक्टर चालू करून त्यांना चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी तलाठी शिंदे यांना बाजुला ओढले. त्यानंतर आरोपी योगेश तसेच भूषण व अन्य दोघा तरुणांनी पथकातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना त्यांच्याच गाड्यांना लावलेल्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, पथकातील एका कर्मचाऱ्याने अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती दिली. तेव्हा चारही आरोपी घटनास्थळी ट्रॅक्टर तसेच दोन्ही मोटारसायकली सोडून शेतांमध्ये पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 3 लाख 35 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चारही आरोपींच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणण्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न, यासारख्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.