Jalgaon Imp News : वीर जवान विनोद पाटील यांच्यावर रोटवदला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon Imp News : भारतीय सैन्य दलात अहमदाबाद येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील (वय 39) यांचा शनिवारी (ता.18 नोव्हेंबर) आकस्मिक मृत्यू झाला होता. जन्मगावी रोटवद (ता.धरणगाव) येथे रविवारी (ता.19) त्यांना आप्तेष्टांसह हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीर जवान विनोद शिंदे-पाटील यांचे पार्थिव रविवारी सकाळी रोटवद येथे आणण्यात आल्यानंतर पुष्पमाळांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तर शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून अमर रहे…अमर रहे…वीर जवान विनोद पाटील अमर रहे, भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत होते. वीर जवान विनोद पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष गायकवाड, धरणगावचे तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, रोटवदचे सरपंच सुदर्शन पाटील, पोलिस पाटील नरेंद्र शिंदे यांचेसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानाला अभिवादन केले. पोलिस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा आदित्य याने मुखाग्नी दिला. याप्रसंगी जवान विनोद पाटील यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

WhatsApp Group
Previous articleIndian Railways : भुसावळ, जळगावच्या प्रवाशांसाठी अमरावती-पुणे एक्सप्रेसची वेळ बदलणार ?
Next articleAgriculture News : तुषार सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर पुन्हा सूक्ष्म सिंचनाचा लाभ