जळगावमध्ये कृषी समित्यांची आढावा बैठक दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांना अधिक गती यावी म्हणून सर्व कृषी समित्यांची बैठक आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी होणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन म्हणून देखील गौरविण्यात येणार आहे.

जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व शासकीय सदस्यांना आमंत्रित करुन विविध शासकीय समित्यांच्या मासिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांची सन 2023/24 ची गोपनीय अहवालाची माहिती भरताना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेला प्रगतीच्या आधारावर 1 ते 10 गुणांकन देण्यात यावे. या योजनेतील तालुक्याच्या प्रगतीच्या आधारावर उत्कृष्ट तालुका कृषी अधिकारी यांची क्रमवारी ठरवून उत्कृष्ट अधिकाऱ्यांचे नाव जाहीर करुन त्यांचा गौरव करण्यात यावा. त्याबाबत माध्यमातून प्रसिद्धी द्यावी. जेणे करून इतरांनाही कामाची प्रेरणा मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

हरितगृह, शेडनेट तपासणी अहवाल सादर
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक बाबीमधील संरक्षित शेती घटकांतर्गत मोका तपासणी होऊन अनुदान अदायगी झालेल्या हरितगृह व शेडनेट गृह यांची 100 टक्के फेर तपासणीचा यावेळी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार जळगांव जिल्हयात एकूण 328 शेतकऱ्यांना हरितगृह व शेडनेट यांचा लाभ देण्यात आलेला आहे. फेरतपासणी करतेवेळी 291 हरितगृह व शेडनेट सुस्थितीत जागेवर आढळुन आले होते. एकुण 37 हरितगृह व शेडनेट ( वसुल पात्र रक्कम रुपये 5 कोटी 74 लाख 21 हजार 285 रुपये) उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अहवालानुसार अनुदान दिलेल्या गटात आढळून आले नाहीत. जळगांव जिल्हयात मधुमक्षिका पालन घटकाची फेर तपासणीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार जळगांव जिल्ह्यात एकुण 3 मधुमक्षिका पालन प्रकल्पाचा लाभ देण्यात आलेला होता. त्यापैकी 3 प्रकल्प (वसुल पात्र रक्कम रुपये 4 लाख 95 हजार रुपये मात्र) जागेवर आढळून आलेले नाहीत.

WhatsApp Group
Previous articleशुक्रवार (ता. 16 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleअत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल- अजित पवार