जळगाव जिल्ह्यात केळीसाठी मनरेगा योजना राबविण्यातील अडचणी अखेर झाल्या दूर

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळीचा मनरेगा योजनेत समावेश करण्यात आला असून, सदरची योजना राबविण्याकरिता तालुकास्तरावर कृषी सहाय्यकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मात्र, कृषी सहायकांची नियुक्ती संबंधित गावांमध्ये असताना देखील त्यांची प्रतिनियुक्ती इतर कार्यालयांमध्ये केल्याने मनरेगाच्या माध्यमातून केळी लागवडीचे काम रखडले होते. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून सदरचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला आहे.

विशेषतः जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा खु., किनोद, भोकर, कठोरा या परिसरातील केळी उत्पादक शेतकरी मनरेगा योजनेच्या लाभापासून वंचित होते. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी वेळोवेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटी देऊन संबंधित विषयाबाबत तोडगा काढण्याची विनंती सुद्धा केली होती. परंतु, कुठलाही उपयोग झाला नव्हता. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या सोबत चर्चा करून या विषयात तात्काळ तोडगा काढण्याबाबत मागणी केली.

केळी उत्पादकांना मोठा दिलासा
जळगाव तालुक्यातील करंज, किनोद, धानोरा खू., कठोरा, भादली खु., भोकर, फुपणी इ. परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत केळी लागवड करण्यासाठीचे प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर केले होते. परंतु त्या शेतकऱ्यांचे लागवड करण्यापुर्वीचे जिओ टॅग फोटो अपलोड करणे, जमीन तयार करणे व मशागतीचे मस्टर काढणे ही कामे कृषी विभागाचे कर्मचारी जागेवर नसल्याने रखडली होती. परिसरातील शेतकरी मनरेगाच्या लाभापासून वंचित राहिले होते. संबंधितांनी वेळोवेळी कृषी विभागाशी संपर्क केला. परंतु प्रश्न न सुटल्याने भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी शेतकऱ्यांसह कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विषय मार्गी लावला. त्यामुळे केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.

WhatsApp Group
Previous articleशनिवार (ता. 17 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleहिमाचल प्रदेश सरकार गायीच्या दुधाला देणार 45 रूपये लिटर प्रमाणे खरेदी दर