Jalgaon News : केंद्र सरकार जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्र.1 साठी सुमारे 278 कोटी 62 लाख रूपये निधीला मान्यता मिळाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे 8,477 हेक्टर शेती क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे.
Central government approves 278 crore fund for surface irrigation of Bodwad area
जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील 53 हजार 449 हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्र.1 मधील कामांना केंद्राने उपलब्ध केलेल्या निधीमुळे आता चालना मिळणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (Public Investment Board) बैठकीत तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत या निधीला मान्यता प्राप्त झाली आहे. या योजनेच्या टप्पा-1 ची एकूण किंमत 2141.19 कोटी रूपये असून कामाप्रित्यर्थ किंमत 1923.81 कोटी रूपये एवढी आहे. सदर योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धीत सिंचन योजनेत झाल्याने विदर्भातील 6167 हेक्टर व अवर्षण प्रवण भागातील 9507 हेक्टर तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील 6546 हेक्टर, अशाप्रकारे बुलडाणा जिल्ह्यातील 13,743 हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील 8477 हेक्टर, अशा एकूण 22,220 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा मिळणार आहे. मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार या कामाची उर्वरीत किंमत 694.27 कोटी रूपये असून त्यापैकी 278.62 कोटी रूपये येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार आहेत. उर्वरीत 416.25 कोटी रूपये राज्य शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत.