Jalgaon Polytics : एकनाथ खडसे असे का म्हटले ? तर गिरीश महाजनांनी मला जोडे मारावे…

Jalgaon Polytics : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे दोन्ही नेते कधीकाळी भारतीय जनता पार्टीत जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करत होते. खडसे राष्ट्रवादीत गेल्यापासून दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढतच चालल्या आहेत. परवा तर महाजनांनी थेट खडसेंच्या आजारपणाला ढोंग संबोधून कोर्टाची नोटीस आल्यामुळे त्यांनी सर्व नाटक केल्याचा आरोप केला. दुसरीकडे खडसेंनी माझा आजार खोटा सिद्ध झाल्यास गिरीश महाजनांनी मला भरचौकात जोडे मारावे, असे आव्हान आज दिले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथ खडसे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने काही दिवसांपूर्वी मुंबईला हवाई रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले होते. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खडसेंनी बरे वाटू लागल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांचे फोनवरून आभार सुद्धा मानले होते. रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर एकनाथ खडसे आता पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असून, त्यांनी जळगावात भाजप आणि मित्रपक्षांवर आगपाखड देखील केली आहे. अशा या परिस्थितीत इतके दिवस शांत असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही थेट एकनाथ खडसेंच्या आजारपणावरच बोट ठेवले आहे. मंत्री महाजन यांनी जळगावात प्रसार माध्यमांसमोर बोलताना खडसेंना टोला मारला की, तुम्ही आधी तब्येतीची काळजी घ्या, सर्व प्रश्न आपोआप सुटतील. कोर्टाकडून सुमारे 137 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस आल्यावर ढोंगे करायची, काही झालेले नसताना दवाखान्यात जाऊन बसायचे, पुन्हा स्टेटमेंट द्यायला तयार व्हायचे, माझी तब्येत खराब आहे म्हणत मुख्यमंत्र्यांकडून विमान मागवायचे. त्यांना कोणता अटॅक आला आहे, कोर्टाची थोडीशी सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी सगळी नाटके केली आहेत. आमचे सरकार आमचे नेते सगळे सांभाळण्यास तयार आहेत. तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या, असाही सल्ला मंत्री महाजन यांनी खडसेंना दिला.

एकनाथ खडसेंचाही गिरीश महाजनांवर पलटवार

दरम्यान, गिरीश महाजनांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, गिरीश महाजनांची माझ्या आजारपणाची खात्री करण्यासाठी दवाखान्याची संपूर्ण फाईल तपासावी. संत मुक्ताईंचा आशिर्वाद माझ्याशी पाठ्याशी होता म्हणून मी मोठ्या आजारातून बरा झालो. महाजनांना माझे आव्हान आहे, त्यांनी माझा आजार खरा आहे की खोटा तपासून घ्यावे. माझा आजार खोटा आहे किंवा फक्त सहानुभूती मिळविण्यासाठी मी ढोंग केले असेल तर त्यांनी मला भरचौकात जोडे मारावे. नाही तर खरे मर्द असाल तर मी तुम्हाला भरचौकात जोडे मारेल, त्यांनी माझे आव्हान स्वीकारावे.

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : उद्या शुक्रवारी (ता. 24 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव
Next articleJalgaon News : जळगाव जिल्ह्यातील 11,360 केळी उत्पादकांना पीकविमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा