Mahalaxmi Saras : महालक्ष्मी सरसमध्ये महिला बचतगटांनी केली सुमारे 25 कोटी रूपयांची उलाढाल

Mahalaxmi Saras : राज्यातील महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर यंदा 26 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. दोन आठवड्यांच्या या प्रदर्शानाला नागरिकांनी यंदाही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे महिला बचतगटांनी सुमारे 25 कोटी रूपयांपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात राज्यभरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या भरतकामाच्या साड्या, बांबुच्या वस्तू, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरिअल, चादरी, कार्पेट, पडदे तसेच घरगुती मसाले, पापड, कुरड्या आणि बऱ्याच खाद्य पदार्थांची दालने होती. यंदाच्या या प्रदर्शनाला राज्यातूनच नव्हे तर देशातून व विदेशातून भेट देणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. शाळांच्या विद्यार्थ्यांनीही शैक्षणिक सहली काढून महालक्ष्मी सरसला भेट दिली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून विशेषतः मुंबई शहरातील नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला, जो शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता. त्यामुळेच 5 जानेवारीपर्यंत सुमारे 20.81 कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल प्रदर्शनात झाली होती. नंतरच्या तीन दिवसातही मोठी आर्थिक उलाढाल महिला बचतगटांनी केली. त्याद्वारे संसाराला मोठा हातभार लागल्याने निर्माण झालेला आनंद संबंधित सर्व महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे कष्टाचे चीज झाल्याची प्रतिक्रिया देखील अनेक महिलांनी दिली.

गेल्या वर्षी झाली होती 17 कोटींची विक्री

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सहभागी होऊन बचतगटाच्या महिलांनी सुमारे 17 कोटी रूपयांच्या उत्पादनांची विक्री केली होती. त्यातुलनेत यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 25 कोटी रूपयांपेक्षा जास्त विक्री होईल, असा अंदाज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला होता. मंत्र्यांचा तो अंदाज खरा ठरला असून, महालक्ष्मी सरसमधील बचतगटांच्या उत्पादनांची अपेक्षापेक्षा जास्त झालेली विक्री महिलांचा उत्साह वाढविणारी ठरली आहे.

WhatsApp Group
Previous articleJain Irrigation : जळगाव येथील जैन इरिगेशनला हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान
Next articleBamboo Farminig : बांबूच्या शेतीला शासनाकडून चालना, मुंबईत मंगळवारी शिखर परिषदेचे आयोजन