Milk Rate : पशुखाद्यासह वैरणीचे भाव आवाक्याबाहेर गेल्यानंतरही उत्पादनखर्चाच्या मानाने गायीच्या दुधाला भाव मिळत नसल्याने महाराष्ट्रातील पशुपालक हैराण झाले आहेत. दुसरीकडे हिमाचल प्रदेशसारख्या राज्याने गायीच्या दुधाला सुमारे 45 रूपये प्रति लिटरचा आणि म्हशीच्या दुधाला 55 रूपये प्रति लिटरचा दर जाहीर करून तेथील पशुपालकांना सुखद धक्का दिला आहे.
हिमाचल प्रदेश सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सुक्खू यांनी शनिवारी (ता. 17) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात करण्यात आलेल्या घोषणेनुसार गायीच्या व म्हशीच्या दुधाला किमान आधारभूत दर देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. शेतकरी आणि पशुपालकांना सुखी आणि समृद्ध बनविणे आमच्या सरकारची प्राथमिकता आहे, असेही हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुक्खू यांनी म्हटले आहे.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2024/02/Thumbnail-406-jpg.webp)
1 एप्रिल 2024 पासून नवीन दर लागू
सध्या हिमाचल प्रदेशात म्हशीच्या दुधाला किमान 47 रूपये प्रति लिटरचा दर देण्यात येतो. अर्थसंकल्पात वाढ जाहीर झाल्यानंतर त्याठिकाणी आता म्हशीच्या दुधाला किमान आधारभूत दर म्हणून 55 रूपये प्रति लिटरचा दर देण्यात येणार आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात सध्या गायीच्या दुधाला 38 रूपये प्रति लिटरचा दर देण्यात येत आहे. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या वाढीमुळे त्याठिकाणी आता गायीच्या दुधाला किमान आधारभूत दरानुसार 45 रूपये प्रति लिटरचा दर देण्यात येणार आहे. दोन्ही प्रकारच्या दुधाचे नवीन खरेदीदर हे 1 एप्रिल 2024 पासून लागू केले जाणार असून, पशुपालकांकडून वसूल केली जाणारी मार्केटिंग फी देखील आता हिमाचलमध्ये माफ होणार आहे. विशेष म्हणजे बाहेर कोणी दुधाला राज्य शासनापेक्षा जास्त खरेदीदर देत असेल तर उत्पादकांना त्याठिकाणी दूध विकण्यास मुभा आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)