राज्याच्या ‘या’ भागात आज जोरदार पावसाचा अंदाज, खान्देशची कशी राहील स्थिती ?

गावशिवार न्यूज । राज्यात बऱ्याच भागात मॉन्सून अर्थात मोसमी वारे दाखल झाले असून, ठिकठिकाणी पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी देखील लागली आहे. मात्र, खान्देश तसेच विदर्भाच्या काही भागात अजुनही पावसाला अपेक्षित जोर दिसून आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज शुक्रवारी (ता.14) कोकण किनारपट्टीच्या भागात तसेच बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ( Monsoon Update)

मॉन्सून सीमेपर्यंत येऊन ठेपला तरी पावसाला पाहिजे तेवढा जोर नसल्याने राज्याच्या अनेक भागातील खरिपाच्या पेरण्यांना अजुनही सुरूवात झालेली नाही. पेरणीपूर्व मशागत आटोपून बसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा त्यामुळे आभाळाकडे लागल्या आहेत. दरम्यान, गुरूवारी (ता.13) जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी तब्बल तासभर पाऊस कोसळला. मात्र, उर्वरित जिल्ह्यात पाण्याचा थेंब देखील पडला नाही. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात देखील अद्याप पावसाची प्रतिक्षाच आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. मात्र, अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनचा बंगालच्या उपसागरावरील वेग मंदावलेला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात अद्यापही मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. पावसाचा पत्ता नसलेल्या भागात कमाल तापमानात सुद्धा वाढ झाली आहे. तसेच वातावरणातील उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या आहेत.

WhatsApp Group
Previous articleजळगाव शहर व परिसरात गुरूवारी दुपारनंतर मॉन्सूनची जोरदार हजेरी !
Next articleशासन राज्यातील दुष्काळ सदृश्य 1245 महसूल मंडळात सुरू करणार चारा डेपो