गावशिवार न्यूज | महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच एसटीची बस आता डिझेलऐवजी एलएनजी गॅसवर धावणार आहे. प्रवाशांना परवडणारी व पर्यावरणपूरक प्रवासाची सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किंग गॅस कंपनीसोबत त्यासाठी महत्वाचा करार देखील केला आहे. (MSRTC)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (भांडार व खरेदी) वैभव वाकोडे उपस्थित होते. एसटी महामंडळाकडे डिझेलवर चालणाऱ्या सुमारे 16 हजार बसेस आहेत. त्यामुळे एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के खर्च फक्त डिझेलवर केला जातो. ही स्थिती लक्षात घेता हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेलऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स् गॅस प्रा.लि. यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे.
एसटी महामंडळाचे दरवर्षी सुमारे 234 कोटी रूपये वाचणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल 5 हजार बसेस साधारण सहा टप्प्यात एलएनजी (द्रवरूप नैसर्गिक वायू) गॅससारख्या पर्यायी इंधनावर धावण्यासाठी सज्ज होणार आहेत. यामुळे डिझेल वापरल्याने होणारे प्रदूषण जवळपास 10 टक्के कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे. त्यासोबतच डिझेलवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होऊन एसटी महामंडळाचे दरवर्षी सुमारे 234 कोटी रूपये वाचणार आहेत. महामंडळाच्या डिझेलच्या खर्चात मोठी बचत झाल्याने प्रवाशांनाही परवडणाऱ्या तिकीट दरात पर्यावरणपूरक प्रवाशाचा आनंद लुटता येईल. महामंडळाकडून राज्यातील 90 आगारांमध्ये एलएनजी गॅस भरण्याची सोय देखील करण्यात येणार आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)