Multipurpose Mini Tractor : शेती मशागतीची कामे मजूर टंचाईमुळे दिवसेंदिवस कठीण होत चाललेली असताना, स्वतःचे डोके चालवून कमी खर्चाचा तीनचाकी मिनी ट्र्रॅक्टर तयार करण्याची किमया जळगाव जिल्ह्यातील लोणी (ता.पारोळा) येथील प्रयोगशील शेतकरी तथा कृषीतज्ज्ञ श्री. भगवान पाटील यांनी साधली आहे. आजच्या लेखात आपण त्यांची यशकथा जाणून घेणार आहोत.
Low cost three wheeler minitractor saves money, wages and labor
भगवान पाटील पूर्वी खासगी कृषी सल्लागार होते. सध्या ते सुरत येथील सागर बायोटेक प्रा.लि. या कंपनीत जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून ते गावी असलेली आपली शेती पत्नीच्या मदतीने पाहतात. त्यांच्याकडे पूर्वी शेती मशागतीची कामे करण्यासाठी दोन बैलजोड्या होत्या. सालगडी चारा-पाण्याची देखभाल व्यवस्था पाहण्यासाठी असत. खरीप व रब्बी हंगाम आटोपल्यावर बैल व सालगड्याला फार काम नसायचे. खर्चाला लगाम घालण्यासाठी ट्रॅक्टर घेण्याचा विचार पाटील यांच्या मनात यायचा, पण त्यासाठी सुद्धा वर्षभर काम नव्हते. शिवाय खरेदीवर मोठी गुंतवणूक करणे त्यांना रूचत नव्हते.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2023/11/Untitled-316.jpg)
अशी सूचली मिनी ट्रॅक्टरची संकल्पना
कंपनीच्या कामानिमित्त भगवान पाटील यांना एकदा गुजरातच्या भावनगरात जाण्याचा योग आला. तेथे शेती उपयोगी अवजारे तयार करणाऱ्या कारखान्याकडे त्यांची नजर गेली. त्यांच्या मनातील मिनी ट्रॅक्टरबद्दलचा विचार त्यांनी संबंधित कारागिराला सांगितला. त्यानेही फक्त आयडिया सांगा लगेच यंत्र बनवून देतो, असे सांगून आश्वस्त केले. त्यांचे सहकारी मनीष पटेल यांनीही काही गोष्टी सूचवल्या. त्यातूनच पुढे जाऊन तीन चाकी मिनी ट्रॅक्टरचे माॅडेल तयार झाले. आयडिया येत गेली तशी सुट्या भागांची जमवाजमव सुरु झाली. बहुतेक सामान भंगारातून आणला. इंजिनचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी उपसा करणारे 10 अश्वशक्तीचे इंजिन खरेदी केले. त्यानंतर गिअर बाॅक्स, चाके असा एकएक सामान आणून मिनी ट्रॅक्टर आकारास आणला. त्यासाठी खर्च झाले दीड लाख रूपये. पैकी 40 हजार रूपये फक्त डिझेल इंजिनवर खर्च झाले.
अशी आहेत मिनी ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
■ ट्रॅक्टरच्या मागील दोन्ही चाकांमधील अंतर 31 इंच असल्यामुळे कमी अंतराच्या सरीतून चालवणे सहज शक्य असते. चाकांना उलट केल्यावर दोन्ही चाकातील अंतर 40 इंच देखील होऊ शकते. अशी सोय नामांकीत कंपन्यांच्या चारचाकी मिनी ट्रॅक्टरमध्ये सहसा नसते.
■ अंतर कमी किंवा जास्त करण्याच्या सोयीमुळे मका, ज्वारी, झेंडू, कपाशी पिकांमध्ये हा तीनचाकी मिनी ट्रॅक्टर सहज चालतो.
■ मिनी ट्रॅक्टरद्वारे उडीद, मुगाची पेरणी व झेंडू पिकाची आंतरमशागत भगवान पाटील यांनी यशस्वी केली आहे. नांगरणी, वखरणी, पेरणीची कामे तो करू सोप्या पद्धतीने करू शकतो.
■ प्रति तास सुमारे पाऊण लिटर डिझेल लागते. आंतरमशागतीची कामे हा ट्रॅक्टर पाच लिटर डिझेलमध्ये पाच एकरांपर्यंत करू शकतो. रस्त्याने धावताना सुमारे 50 किलोमीटर प्रतिलिटर प्रमाणे एव्हरेज मिळते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)