Nashik News : शेताच्या बांधावरून म्हणा किंवा शेतरस्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये नेहमीच वाद होताना दिसून येतात. त्या वादातून शेतातील उभ्या पिकाचे अनेक प्रकारे नुकसान केल्याच्या घटनाही बऱ्याचवेळा उघडकीस येतात. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही एका शेतातील तयार रोपांवर काही समाजकटकांनी बदल्याच्या भावनेतून तणनाशकाची फवारणी केली असून, संबंधित शेतकऱ्याचे त्यामुळे सुमारे 50 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
In Malegaon taluka, Samajkantkas sprayed herbicides on onion plants
रावळगाव (ता.मालेगाव) येथील शेतकरी दिलीप जाधव यांनी तीन एकर क्षेत्रावर कांदा लागवड करण्याच्या उद्देशाने शेताच्या एका बाजुला रोपांचे वाफे तयार करून ठेवले होते. त्यासाठी त्यांना 15 हजार रूपयांचे बियाणे लागले होते. साधारण दीड महिन्यांचे रोप लागवडीसाठी तयार असताना, शेतकरी जाधव यांनी मजूर मिळाल्यावर कांदा लागवड करण्याची तयारी देखील केली होती. मात्र, जाधव यांचे कुटुंब काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचे निमित्त साधून अज्ञात समाजकटंकांनी त्यांचा डाव साधला. तीव्र तणनाशक कांद्याच्या रोपांवर फवारून त्यांनी संपूर्ण रोपवाटिका उद्धवस्त करून टाकली. शेतकरी दिलीप जाधव हे शेतावर गेल्यानंतर त्यांना तणनाशकामुळे कांद्याच्या रोपांची वाट लागल्याचे दिसून आले. बियाण्यासह मेहनत वाया तर गेलीच, कांदा लागवडीचे स्वप्नही धुळीस मिळाल्याने जाधव यांनी डोक्याला हात लावला. शक्यतो रात्रीच्या अंधारात समाजकटकांनी कांद्याच्या रोपांवर तणनाशक फवारण्याचे काम केले असावे, असे परिसरातील शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)