कांदा उत्पादक शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले पत्र

गावशिवार न्यूज | नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कांदा लागवडीसह उत्पादनात अग्रेसर असले तरी भ्रष्ट सरकारी यंत्रणेमुळे त्यांना सरकारच्या कांदा उत्पादकांसाठी राबविल्या जाणाऱ्या कोणत्याच योजनांचा पुरेपुर लाभ मिळत नाही. केंद्र सरकार नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून कांदा करीत असताना त्यातही मोठा गैरकारभार होतो आहे, अशी तक्रार चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Onion farmer directs letter to Prime Minister Narendra Modi

शेतकरी न्याहारकर यांनी कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडणारे पत्र पंतप्रधानांसह देशाचे सहकार मंत्री अमित शहा तसेच वित्तमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रिय कृषिमंत्री अर्जून मुंडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविले आहे. केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रतिकिलो एक रूपयांचे अनुदान मिळाले तरी प्रत्यक्ष लाभार्थीला 15 पैसेच मिळतात. शासकीय यंत्रणा तब्बल 85 पैसे खिशात टाकून मोकळी होते. या भ्रष्ट्राचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज आहे. तसेच कांद्यावर लादलेली निर्यातबंदी तातडीने उठवून शेतकऱ्याला सरकारने दिलासा द्यावा, अशी विनंती चांदवड तालुक्याचे शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

नाफेड व एनसीसीएफ यांना लगाम घाला

केंद्र सरकारने कांदा उत्पादकांचे हीत साधण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ यांना थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात खुल्या बाजारात दोन्ही संस्था ह्या केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांचा कांदा खरेदी करतात. बाजारात दोन्ही संस्था व्यापाऱ्यांचे हीत जोपासण्यावर जास्त भर देतात आणि शेतकऱ्यांच्या रक्ताचे शोषण करतात, असा आरोप देखील शेतकरी श्री.न्याहारकर यांनी पत्रात केला आहे.

WhatsApp Group
Previous articleहापूस आंब्यासाठी यंदा ‘या’ महिन्यापर्यंत पाहावी लागणार वाट
Next articleकोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी 4 ते 7 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता