गावशिवार न्यूज | कांदा हा नाशवंत शेतीमाल असल्याने त्याची साठवणूक करण्यात शेतकऱ्यांना बऱ्याच मर्यादा येतात. वेळेवर विक्री न झाल्यास कांदा खराब होऊन रस्त्यावर देखील फेकावा लागतो. परिणामी, शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. ही नेहमीची समस्या लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात कांद्यापासून पावडर (भुकटी) तयार करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. (Onion Processing Plant)
देशातील एकूण कांदा लागवडीत व उत्पादनात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे एक लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर कांद्याची लागवड होत असते. त्यातही नाशिक, पुणे, सोलापूर, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि सातारा हे जिल्हे कांदा लागवडीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय मराठवाडा, कोकण व विदर्भातही कांद्याची लागवड होते. खासकरून नाशिक जिल्हा कांद्याचे आगर मानलो जातो. देशाचा विचार केला तर एकट्या नाशिक जिल्ह्यात सुमारे 10 ते 15 टक्के कांदा लागवड आणि उत्पादन घेण्यात येते.
पथदर्शी प्रकल्पामुळे कांदा उत्पादकांना दिलासा
नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी कांदा पावडर प्रकल्पामुळे कांदा उत्पादकांना खूप मोठा दिलासा मिळू शकेल. कांद्यापासून पावडर तयार करणारा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची मागणी विधान परिषदेचे माजी सदस्य जयवंतराव जाधव यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या त्या मागणीचा सकारात्मक विचार करून शासनाने मुंबईत पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कांदा पावडर निर्मितीच्या पथदर्शी प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)