निर्यातबंदी हटविताच लासलगावमध्ये कांद्याच्या दरात 500 रूपयांची झाली वाढ

Onion Rate : केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत लादलेली कांदा निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रूपयांची वाढ झाली आहे. सोमवारी (ता. 19) लासलगावात कांद्याची 8935 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 2101 आणि सरासरी 1800 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

केंद्राने कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर राज्यातील विविध ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दर पडल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विक्री करावी लागली. त्यामुळे विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने देखील केली होती. यापार्श्वभूमीवर पुन्हा कांद्याची परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्रात येऊन गेले. त्यानंतर लगेचच कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. दरम्यान, कांदा निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला तरी केंद्राने त्यासंदर्भात अधिसूचना अद्याप काढलेली नाही. तत्पूर्वीच कांद्याच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लासलगावातील कांद्याचे दर (प्रति क्विंटल)
● 19 फेब्रू- 1000 ते 2101 रूपये
● 17 फेब्रू- 700 ते 1441 रूपये
● 16 फेब्रू- 700 ते 1331 रूपये
● 15 फेब्रू- 700 ते 1451 रूपये
● 14 फेब्रू- 700 ते 1321 रूपये
● 13 फेब्रू- 700 ते 1500 रूपये

WhatsApp Group
Previous articleमंगळवार (ता. 20 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleगव्हाच्या ‘या’ वाणाला पुण्यात कमाल 5200 रूपये प्रति क्विंटल मिळाला दर