भूक, भोग, भोजन विसरतो तोच भक्त परमात्म्यापर्यंत पोहोचतो : पंडित प्रदीप मिश्रा

Pandit Pradeep Mishra : शिवमहापुराण कथा श्रवणासाठी आलेल्या भाविकांच्या तीन गोष्टी समाप्त होतात. पहिली गोष्ट भूक, सकाळी सहापासून सायंकाळपर्यंत कथा श्रवणासाठी बसूनही जेवणाची इच्छा कोणालाच होत नाही. दुसरी गोष्ट भोग, पैशांची कमी कोणाजवळ नाही. पण त्याचा त्याग करून प्रत्येकजण समर्पण भावनेने कथा ऐकण्यासाठी बसला आहे. तिसरी गोष्ट भोजन, घरी पुरणपोळी तसेच खीर, गोडधोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण कथेच्या ठिकाणी शिवबाबाकडून जे मिळाले ते सर्वजण खातात. भूक, भोग आणि भोजन या तीन गोष्टी जो विसरतो तोच भक्त परमात्म्यापर्यंत पोहोचतो, असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा यांनी आज बुधवारी (ता.06) केले.

A devotee who forgets hunger, indulgence and food reaches the Supreme Soul: Pandit Pradeep Mishra

जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिराजवळ आयोजित सात दिवसीय श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रमात बुधवारी उपस्थित लाखोंच्या समुदायाला संबोधित करताना सुखी जीवनासाठी नातेसंबधांचे महत्व पंडित प्रदीप मिश्रा यांनी पटवून दिले. कथा कार्यक्रमाला पहिल्या दिवशी सुमारे 4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती होती. आज त्यापेक्षा जास्त गर्दी कथा श्रवणासाठी जमली होती. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही सलग दुसऱ्या दिवशी कथेच्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती होती.

तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमधील चांगुलपणाचे दर्शन घ्या

परमेश्वराने फक्त भोग विलासासाठी आपल्याला शरीर दिलेले नाही, त्याचा चांगला उपयोग करून जीवनाचे सार्थक करा. डोळे दिले आहेत तर परमेश्वराचे, संत व महात्म्यांचे दर्शन घ्या. त्यासोबत आपण ज्यांना भेटतो, त्यांच्यामध्ये परमात्माचे दर्शन घेतल्याची अनुभुती घ्या. प्रत्येकामध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करा. फक्त मंदिरात गेल्यावर देवाचे दर्शन घेणे म्हणजे दर्शन नाही. तुम्हाला जी व्यक्ती भेटली त्याच्या चांगुलपणाचे दर्शन घ्या. लग्न जमविताना आपण सुनेमध्ये चांगले गुण पाहतो, लग्न झाल्यानंतर आपण तिच्यामधील दोष का शोधतो. सुनांनाही जन्मदाती आई जेवढी प्रिय असते, तेवढी सासू का आवडत नाही, याचाही विचार करा. दर्शन म्हणजे समोरच्या व्यक्तीमधील चांगुलपणा पाहणे, मग ती सून असो की मुलगी किंवा मुलगा, असे पंडित प्रदीप मिश्रा यांनी स्पष्ट केले.

आपल्या दुखाचे खरे कारण अपेक्षा असते

जहरी प्राणी चावल्यावर इलाज होतो, पण मणुष्य चावल्यावर इलाज होत नाही. तुमची प्रगती पाहून जो जळतो, तो जास्त विषारी असतो. साप-विंचुमध्ये जेवढे विष नसते त्यापेक्षा जास्त विष तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या मनुष्यामध्ये असते. मोठे मन ठेवा, दान-धर्मात कधी हात आखडता घेऊ नका. तुमच्याजवळ कमी शेती असली तरी सुखी व समाधानी राहा. तुमचे सुख पाहुन 10 एकर शेतीच्या मालकाने पण विचार केला पाहिजे, की हा एवढा आनंदी कसा काय राहतो. आपल्या दुखाचे खरे कारण अपेक्षा असते. दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे नैराश्य, दुःखाशिवाय दुसरे काहीच मिळत नाही. अपेक्षा ठेवायची असेल तर भोलेबाबांकडून ठेवा, ते तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत, असेही पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले.

WhatsApp Group
Previous articleवर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर; विदर्भ-मराठवाडा अंतर कमी होणार
Next articleशेतकऱ्यांच्या ‘या’ प्रश्नासाठी विरोधकांचा शासनाच्या चहापानावर बहिष्कार