Pandit Pradip Mishra : जळगाव जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचे आयोजन मंगळवार (ता.05) पासून करण्यात आले आहे. या कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या दृष्टीने सतर्कता बाळगून दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन व कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित यंत्रणांनी एकमेकांना सहकार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिल्या.
Celebration of Shiva Mahapuran katha for seven days from tomorrow in Jalgaon
वडनगरी फाटा येथे 5 ते 11 डिसेंबर दरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्या वतीने पंडित प्रदीप मिश्रा यांची सात दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन तसेच कायदा- सुव्यवस्था दृष्टीने संबंधित शासकीय विभागांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. मंत्री पाटील यांनी बैठकीनंतर प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळावर जात पूर्व तयारीचा आढावा देखील घेतला. कार्यक्रमासाठी एक दिवस अगोदर उपस्थित असलेल्या भाविकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पालकमंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे, साईडपट्ट्या तातडीने बुजवावेत. कार्यक्रम व्यासपीठाची तपासणी करावी. आरोग्य विभागाने खासगी व शासकीय रूग्णालयातील दहा टक्के बेड आरक्षित ठेवावेत. कार्यक्रमस्थळांवर 20 बेडचे रूग्णालय उभारण्यात यावे. पुरेसे फिरते स्वच्छतागृह उभारण्यात यावीत. पुरेशा रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. पोलीस विभागाने वाहतूक नियोजन काटेकोरपणे करावे. एसटी महामंडळाने दररोजच्या 100 बसेसचे नियोजन करावे. महावितरण विभागाने कार्यक्रमस्थळावरील व परिसरातील विद्युत व्यवस्था तपासून घ्यावी. बीएसएनएलने इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्न व औषध प्रशासनाने भाविकांना दिल्या जाणाऱ्या जेवण व पाण्याची तपासणी करावी. महानगरपालिकेने चार अग्नीशमन वाहने कार्यक्रमस्थळावर सुसज्ज ठेवावीत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, कार्यक्रम स्थळावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने घ्यावयाच्या सर्व दक्षतांची परिपूर्तता करावी. जिल्ह्यातील 1200 पोलिसांची कुमक कार्याक्रमाच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी सज्ज करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)