पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी रक्षक हेल्पलाईन नंबरचा शुभारंभ

गावशिवार न्यूज | प्रतिकूल हवामान घटकांमुळे अतोनात नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा मोठा आधार असतो. संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आता केंद्र सरकारने कृषी रक्षक हेल्पलाईन नंबरचा (14447) शुभारंभ करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना पीकविम्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण तातडीने करणे शक्य होणार आहे. (Pikvima Helpline Number)

भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सदरचा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केला जात असून, त्यास कृषी रक्षक हेल्पलाईन नंबर नाव देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येणारी प्रधानमंत्री पीकविमा योजना खूपच प्रभावी ठरली आहे. पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी देशभरातील सुमारे 56 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे अर्ज आजतागायत प्राप्त झाले आहेत. तब्बल 16.06 कोटी शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाईचा लाभ देखील मिळाला आहे. याशिवाय 1.52 लाख कोटी रूपयांची भरपाई नुकसानग्रस्तांना प्रदान करण्यात आली आहे. वैशिष्ट्यपूर्ण अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारी पीकविमा नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध झाली आहे.

कोट्यवधी शेतकरी विमा योजनेचे लाभार्थी
प्रधानमंत्री पीकविमा योजना सातत्याने हवामानाच्या अनिश्चिततेशी निगडीत जोखीम कमी करून कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे. आज कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेऊन निश्चिंत होत आहे, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

WhatsApp Group
Previous articleउत्तर महाराष्ट्रात थंडीचा गारठा कायम, जळगावचा पारा 9.6 अंश सेल्सिअस
Next articleजाणून घ्या, मुंबई बाजार समितीत सध्या कसे आहेत केळीचे भाव ?