गावशिवार न्यूज | राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आली आहे. सदर निर्णयाचे पालकवर्गातून स्वागत होत असून नवीन वेळ नेमकी केव्हापासून लागू होईल, त्याचीही उत्कंठा पालकवर्गाला लागली आहे. (Primary Education)
दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
या कारणांमुळे बदलली शाळा भरण्याची वेळ
विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुदा आजारी पडतात. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)