Rabbi Crop Sowing : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीत रब्बी पिकांची पेरणी करण्यात यंदा मर्यादा आली होती. सुदैवाने बऱ्याच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि रब्बीच्या रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली. प्राप्त माहितीनुसार डिसेंबर 2023 अखेर राज्यभरात सुमारे 47 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी शक्य झाली आहे.
राज्यात रब्बी पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र सुमारे 53 लाख 97 हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी 47 लाख 32 हजार हेक्टर म्हणजेच 88 टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी यंदाच्या हंगामात डिसेंबरपर्यंत झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवसावर राज्यात 51 लाख 92 हजार हेक्टर क्षेत्रावर (96 टक्के) रब्बीची पेरणी पूर्ण झाली होती. नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती या जिल्ह्यात यावर्षी जून ते ऑक्टोबरच्या कालावधीत 50 ते 75 टक्केच पाऊस पडला होता. याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात 75 ते 100 टक्के पाऊस पडला.
पर्जन्य तुटीचा रब्बीच्या पेरणीवर परिणाम
रब्बीच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी परतीचा पाऊस चांगला उपयुक्त ठरतो. दुर्दैवाने परतीच्या पावसाने निराशा केल्याने राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरण्यांना चालना देता आली नाही. पुरेशा पावसाअभावी भूगर्भातील पाणी पातळीतही अपेक्षित वाढ न झाल्याने संरक्षित पाण्यावर गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मर्यादा आली. अनेकांनी त्यामुळे कमी पाण्यावर वाढणारी पिके घेण्यावर भर दिला. त्यामुळेच यंदाच्या खरिपात राज्यातील हरभरा पिकाचे क्षेत्र 22 लाख 44 हजार (47.4 टक्के) हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. खालोखाल रब्बी ज्वारीचे क्षेत्र 13 लाख 40 हजार (28.3 टक्के) हेक्टर क्षेत्रापर्यंत गेले आहे. तर गव्हाचे क्षेत्र 7 लाख 47 हजार (15.8 टक्के) हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहिले आहे. दुसरीकडे मक्याची जेमतेम 2 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण होऊ शकली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)