अवकाळी पावसामुळे राज्यातील रब्बीच्या पेरण्यांना लागला ब्रेक

Rabbi Season : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झालेले असताना, रब्बीच्या पेरण्यांनाही ब्रेक लागला आहे. पावसाची उघडीप मिळाल्यानंतर अपूर्ण राहिलेल्या रब्बीच्या पेरण्यांना जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने बऱ्यापैकी चालना मिळण्याची आता शक्यता आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रावर हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी वाढण्याची चिन्हे आहेत.

Rabi sowing in the state was interrupted due to unseasonal rains

महाराष्ट्र राज्याचे रब्बी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे 53.97 लाख हेक्टर इतके आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर 2023 अखेर 25.10 लाख हेक्टर क्षेत्रावरच (47 टक्के) रब्बी पिकांची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरअखेरचे पेरणी क्षेत्र 30.65 लाख (57 टक्के) होते. त्यातुलनेत यंदा रब्बीच्या पेरणीचे क्षेत्र खूपच कमी असले, तरीही बऱ्याच शेतकऱ्यांकडून अजुनही रब्बी हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही शेतकऱ्यांकडून रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, मका, करडई आदी पिकांच्या पेरणीला सुरुवात देखील झाली होती. मात्र, मध्येच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना सुरू असलेल्या पेरण्या थांबवाव्या लागल्या. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या आटोपल्या आहेत, त्यांच्या शेतातील पिके आता डोलू लागली आहे. अवकाळी पावसाचा त्यांना बऱ्यापैकी फायदा देखील झाला आहे.

हरभरा लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता

कृषी विभागाच्या 24 नोव्हेंबर अखेरच्या पेरणी अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत 11.72 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 46.7 टक्के शेती क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड पूर्ण झालेली आहे. खालोखाल रब्बी ज्वारीची 9.63 लाख हेक्टर क्षेत्रावर (38.3 टक्के) रब्बी ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर गहू पिकाची 2 लाख हेक्टर क्षेत्रावर (8 टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. मका पिकाचीही 1.22 लाख हेक्टर क्षेत्रावर (4.9 टक्के) पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांचे पेरणी क्षेत्र नगण्यच असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. मात्र, हरभरा पिकाखालील क्षेत्र आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

WhatsApp Group
Previous articleआंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या बैठकीत ‘या’ विषयांवर मंथन
Next articleशेतकऱ्यांनो पीकविमा काढला का ? फक्त दोन दिवसांची आहे मुदतवाढ