Rain Gauge Installation : शेतकऱ्यांना पावसाच्या अचूक माहितीसह, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळावी म्हणून राज्यातील सुमारे 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचे नियोजन शासन करीत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 3 हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसविण्यात येतील. यामुळे राज्य शासनालाही शेतकरी हिताचे निर्णय घेणे सोपे होईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
Government will install rain gauges in every gram panchayat: Agriculture Minister Dhananjay Munde
नियम 97 अन्वये अवकाळी पाऊस व गारपीट या विषयावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री श्री. मुंडे बोलत होते. सद्यःस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात पर्जन्यमापक यंत्राद्वारे फक्त मंडळनिहाय पाऊस मोजला जातो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पावसाची काटेकोर नोंदणी करण्यात मोठी अडचण येते. अनियमित पावसामुळे कुठे पाऊस पडतो तर कुठे पडत नाही, अशी परिस्थिती निर्माण होत असताना एके ठिकाणी ठेवलेल्या पर्जन्यमापकाच्या आधारे संपूर्ण महसूल मंडळाचा पाऊस मोजणे अजिबात व्यवहार्य नाही. दुर्दैव म्हणजे राज्यात अशाच पद्धतीने पाऊस मोजून शेतकऱ्यांना पीकविमा भरपाईची रक्कम देण्याची पद्धत देखील प्रचलित आहे. यापार्श्वभूमीवर प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाची अचूक नोंद घेण्याकरीता राज्य शासन गांभीर्याने विचार करू लागले आहे. ग्रामपंचायतींमध्ये पावसाची नोंद घेण्याची सोय उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक गावातील पर्जन्याची अचूक नोंद घेणे शक्य होणार असून, शेतकऱ्यांना पीक लागवडीसंदर्भात कृषी विभागाला योग्य ते मार्गदर्शन करता येईल. तसेच विविध योजनांचा योग्य तो लाभ देखील देता येईल. विशेष म्हणजे गावागावात पर्जन्यमापक बसल्यावर शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून दररोज पडलेल्या पावसाची आकडेवारी पाठविणे सोपे जाईल. जेणेकरून शेतकरी त्यांच्या शेतीकामांचे नियोजन वेळोवेळी करू शकतील तसेच पीक पद्धतीत सुद्धा बदल करतील. नावीन्याचा ध्यास घेऊन राज्य शासन सध्या पहिल्या टप्प्यात 3 हजार ग्रामपंचायतीत पर्जन्यमापक बसविण्यासाठी पाऊल उचलत आहे.