अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

गावशिवार न्यूज | अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीत आज श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत संपन्न झाली. रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. (Ram Mandir)

विराजमान रामलल्ला मूर्तीच्या पूजेने प्राणप्रतिष्ठा संकल्पाचा प्रारंभ झाला आणि नंतर नवनिर्मित मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अभिषेकादी उपचारांनी करण्यात आली. सनईच्या सुरांमधे आणि रघुपती राघव राजाराम -पतित पावन सीतारामच्या गजरात नवीन मूर्तीची पूजा मान्यवरांनी केली. अयोध्या नगरीतल्या या वैभवशाली सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवरांसह रामभक्तांची गर्दी झाली होती. त्यात केंद्रिय मंत्री अमित शहा, माजी प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा, तेलगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, उद्योजक मुकेश अंबानी, अनिल अंबानी, सुनील मित्तल, अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी, रणबीर कपूर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, कतरीना कैफ, कंगना राणावत, आलिया भट, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अनुराधा पौडवाल, सोनू निगम, शंकर महादेवन यांच्या रामभजनांचा सुश्राव्य कार्यक्रम झाला.

देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे नेणारी चेतना…
देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे नेणारी चेतना हीच विकासाचं गमक असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केले. समृद्ध परंपरांचा वारसा आणि प्रगतीच्या नव्या दिशा दाखवणारी क्षमता भारताकडे पुरेपूर असल्याचं पटवून देणारी स्थिती आज असून प्रत्येक भारतीयाने त्यासाठी समर्पणाची तयारी करावी असे आवाहन देखील त्यांनी केले. समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्माणाची शपथ घ्या. आगामी एक हजार वर्षाच्या भारताची पायाभरणी करा, असे आवाहन सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी केले.

WhatsApp Group
Previous articleजळगावच्या लालबहादूर शास्त्री टॉवरवर जैन इरिगेशनतर्फे प्रभू श्रीरामांचे विराट दर्शन
Next articleमंगळवार (23 जानेवारी) बऱ्हाणपूर,रावेर, चोपडा,जळगाव येथील केळीचे भाव