गावशिवार न्यूज | महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र मार्फत भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून राहुरी परिसरातील खडांबेचे पशुपालक श्री. संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यात संकरित गायीच्या पोटी उच्च वंशावळीच्या साहिवाल कालवडीने जन्म घेतला आहे. या सहिवाल जातीच्या कालवडीचे जन्मत: वजन 27 किलो होते. पिता SA-29 आणि दाता गायी S-9422 असून प्रतिवेत दुध उत्पादन क्षमता 4500 लिटर इतकी आहे. (Sahiwal Cow)
पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र मार्फत विशेष प्रकल्पाअंतर्गत देशी गायींच्या संवर्धनासाठी भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब करून जातिवंत कालवडींच्या पैदाशीवर काही दिवसांपासून भर दिला जात आहे. त्याद्वारे जन्मास आलेल्या कालवडीची पाहणी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, संचालक विस्तार डॉ. सी. एस. पाटील व कार्यक्रम समन्वयक, भ्रूण प्रत्यारोपण डॉ. विष्णू नरवडे, संशोधन उपसंचालक, डॉ. बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच केली.
कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, देशी गोवंशाचे जतन व संवर्धन जलद गतीने करण्यासाठी अद्ययावत भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या गोठ्यात जातिवंत देशी गोवंशाचा पैदास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे त्यात चांगल्या प्रकारे यश देखील मिळाले आहे.