Sharad Pawar : राज्यातील दूध दराचा तिढा सोडवा, शरद पवारांचे शासनाला पत्र

Sharad Pawar : राज्यात गायीच्या दुधाचे खरेदी दर 27 रूपये प्रतिलिटरपर्यंत खाली आल्यानंतर दूध उत्पादकांनी तीव्र आंदोलन छेडले असून, ठिकठिकाणी रस्त्यावर दूध ओतण्यासह तहसील कार्यालयात गायींचा कळप सोडून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीची अंमलबजावणी करून घ्यावी, असे आवाहन माजी केंद्रिय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका पत्रान्वये केले आहे.

Sharad Pawar’s letter to the government to solve the milk price crisis in the state

गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 जुलै 2023 रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान 34 रुपये प्रतिलिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे व त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे. उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ.अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी, असेही शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज्यातील दूध उत्पादकांचे हीत साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चार महिन्यांपूर्वी गायीच्या 3.5 फॅट व 8.5 टक्के एसएनएफ दुधाला किमान 34 रूपये प्रतिलिटर दर देण्याचे आदेश खासगी व सहकारी संघांना दिले होते. प्रत्यक्षात शासनाच्या आदेशाला खासगी दूध संघ सोडाच सहकारी संघ सुद्धा मानण्यास तयार नसल्याचे आता निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सध्या गायीच्या दुधाचे दर 27 रूपयांपर्यंत खाली आले आहेत. गायीच्या दुधाचे खरेदीदर वाढवून मिळावे आणि दुधातील भेसळ रोखण्यासाठी तातडीने कठोर कारवाई सुरु करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शासनाला लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

WhatsApp Group
Previous articleWheather Update : राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा येलो अलर्ट कायम
Next articleCrop Damage : संकटातील शेतकऱ्यांना एकरी 25 हजार भरपाई द्या, विरोधकांची मागणी