देशातील तीन कोटी शेतकऱ्यांसाठी श्री अन्नाचे उत्पादन ठरतेय फायदेशीर

गावशिवार न्यूज | विटामीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सीडेंटचा समावेश असलेले श्री अन्न आजकाल अनेक आजार दूर ठेवण्यासाठी सर्रास वापरले जात आहे. त्यामुळे श्री अन्नाचा प्रचार लहान शेतकऱ्यांकरीता खूपच फायदेशीर ठरत आहे. त्यावर आधारीत उद्योगांमुळे अनेक तरूणांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. आज देशभरातील सुमारे 3 कोटी शेतकऱ्यांसाठी श्री अन्नाचे उत्पादन फायदेशीर ठरत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (Shree Anna)

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री श्री. मोदी हे बोलत होते. पोंगलचा सण हा एक भारत श्रेष्ठ भारताची भावना दर्शवत असून देशाची एकात्मतेची भावना विकसित भारत 2047 ला बळ देईल, असा विश्वास देखील प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. देशातील तब्बल तीन कोटी शेतकरी श्री अन्नाचं उत्पादन घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पद्दूचेरीचे नायब राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते.

भरड धान्य श्री अन्न म्हणून ओळखले जाणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार भरड धान्य आता ‘श्री अन्न’ म्हणून ओळखले जाणार आहे. ज्वारी, बाजरी, नागली,नाचणी, कुट्टू, राजगिरा, कोंदरा, कुटकी, वरी, राळा आदींचा त्यात समावेश होतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या भरड धान्याला श्री अन्न हा शब्द वापरून सांगितले आहे की, भारत हा श्री अन्नाचा सर्वात मोठा उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे. भारताला श्री अन्नाचे जागतिक केंद्र बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group
Previous articleकांदा, साखर, तांदूळ, गव्हावरील निर्यातबंदी उठण्याची शक्यता नाहीच
Next articleसोमवारी (15 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव