गावशिवार न्यूज | राज्यातील रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र सुमारे 54 लाख हेक्टर इतके असून, त्यापैकी 15 लाख हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. सदरचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, नवीन हंगामातील उत्पादन हाती येण्यास साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या आवक होत असलेल्या ज्वारीचे भाव मागणी चांगली असल्याने तेजीत आहेत. (Sorghum Market)
महाराष्ट्र् राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सद्यःस्थितीत दैनंदिन दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त ज्वारीची आवक होत आहे. गुरुवारी (ता.18 जानेवारी) देखील राज्यात ज्वारीची 2288 क्विंटल आवक झाली होती. पैकी पुण्यात मालदांडीची 669 क्विंटल आवक होऊन 5800 ते 6600, सरासरी 6200 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. सोलापूरमध्ये मालदांडी ज्वारीची 34 क्विंटल आवक होऊन 3700 ते 4770 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. बीडमध्ये 24 क्विंटल आवक होऊन 2510 ते 4080 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. धाराशिवमध्ये 4 क्विंटल आवक होऊन 3400 ते 3670 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. धुळ्यात दादर 3 क्विंटल आवक होऊन 3500 ते 3900 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. जळगावमध्ये दादर ज्वारीची 15 क्विंटल आवक होऊन 3750 ते 4600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. जालन्यात मालदांडी ज्वारीची 6 क्विंटल आवक होऊन 1701 ते 3650 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता.