गावशिवार न्यूज | विकसित देशांमध्ये कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान असल्यामुळे तेथील नागरिक, शेतकरी यांना नैसर्गिक संकटांपासून सतर्क करता येते. त्यातून आर्थिक व जीवीत हानी टाळता येते. यादृष्टीने तंत्रज्ञानाची कास धरत महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा स्वत:चा उपग्रह असावा. यासाठी मदत व पुनर्वसन विभाग प्रयत्न करत आहे, अशी प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जळगावमध्ये केले. (State Level Workshop)
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन, संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याच्या प्रस्तावाचा शासन सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव जिल्हा प्रशासन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत ‘उष्मालाट पूर्वतयारी व सौम्यीकरण व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेट सभागृहात होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 08) झाले. याप्रसंगी व्यासपीठावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.महेश्वरी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासो धुळाज, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. या कार्यशाळेत अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी मंत्रालयातून ऑनलाईन उपस्थित होत्या. याशिवाय कार्यशाळेला राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महानगरपालिका-नगरपालिकेचे अधिकारी, कृषी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व आपदा मित्र उपस्थित आहेत.
काय म्हणाले मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील ?
आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही भाग उष्णतेच्या लाटेने होरपळत असतो. शेतकरी, शाळकरी मुले व रस्त्यावरील विक्रेते यांना उन्हाच्या लाटेचा थेट सामना करावा लागतो. कार्यशाळेचे माध्यमातून अधिकाऱ्यांनी स्वतःची कल्पकता व सूचनांची मांडणी करावी. निर्णयापर्यंत जाण्यासाठी अनुभवांचे आदान-प्रदान झाले पाहिजे. उष्मा लाट का येते , कशी येते याची कार्यशाळेत कारणांमिमासा झाली पाहिजे. जनजागृतीच्या माध्यमातून मृत्यू दर कमी करता येईल. शेती व रोजगाराचे उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. मृत्यू दर कमी कसा होईल यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचे संरक्षण झाले पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)