Success Story : घरच्यांचा विरोध पत्करून घेतल्या म्हशी…उच्चशिक्षित तरूणावर आज वेळ आली अशी

Success Story : शेती परवडेनाशी झाल्याने शेतकऱ्यांची मुले नोकरी तसेच व्यवसायासाठी आता शहरांकडे धाव घेऊ लागली असून, खेडी ओस पडत चालली आहेत. शेतकऱ्यांच्या मुलीही त्यामुळे लग्नासाठी नोकरी करणाऱ्या मुलांना पसंती देऊ लागल्या आहेत. अशा या बिकट परिस्थितीत शहरात एमएस्सीचे शिक्षण घेतल्यानंतर गावात घरच्यांचा विरोध पत्करून म्हशी सांभाळणारा तरूण योगेश पाटील विरळाच म्हणावा लागेल. आज आपण त्याची यशोगाथा पाहणार आहोत.

जळगाव जिल्ह्यातील खामखेडा (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी असलेल्या योगेश रवींद्र पाटील याने एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) पर्यंतचे शिक्षण जळगाव शहरातून घेतले आहे. त्याचा मोठा भाऊ सुद्धा पीएचडी उत्तीर्ण असून, दोन्ही बहिणी इंजिनिअर आहेत. गावी खामखेडा येथे त्याचे वडिल आणि काका यांचे एकत्र कुटुंब आहे. शिक्षणासाठी जळगावमध्ये बरीच वर्षे स्थायिक राहिल्याने योगेशचा आणि गावाकडील शेतीशी कधी फार संबंध आलाच नाही. बी.एस्सी. होईपर्यंत तरी त्याला खामखेड्यात काय चाललेय हे सुद्धा माहिती नसायचे. त्याने संपूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केले होते. दरम्यान, कोरोनाची साथ आली आणि योगेशला नाईलाज म्हणून गावात जाऊन राहावे लागले. त्या दोन वर्षात त्याचा कधी नव्हे तो गावाशी संबंध आला, शेतीमातीशी एकरूप होण्याची संधी त्यानिमित्ताने त्याला मिळाली. शेतीत काय अडचणी असतात, ते त्याला समजले. त्यावर तोडगा काढण्याचा शक्य तेवढा प्रयत्न त्याने केला. वडिल व काका यांना घरच्या शेतीत शक्य तेवढी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. तशात त्याला गावी राहताना दुग्ध व्यवसायाचे आकर्षण वाटू लागले. नाहीतरी शिक्षण घेताना त्याने दुधाच्या प्रोजेक्टवर काम केले होतेच. याशिवाय पिशवीबंद दुधात कशी घातक रसायनांची भेसळ केली जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्याला परीक्षणानंतर आलेला होता. ते लक्षात घेऊन जळगाव शहरातील ग्राहकांना निर्भेळ दूध पुरविण्याचा विचार योगेशच्या डोक्यात आला. त्याने तो वडील व काकांजवळ बोलून दाखवला. घरच्या गोठ्यात दोन गावठी म्हशी आधीपासून होत्या, आणखी काही म्हशी विकत घेऊन दुग्ध व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवण्याच्या दृष्टीने योगेशने पाऊले उचलली.

म्हशी घेण्यास घरच्यांचा झाला प्रचंड विरोध

योगेश हा एम.एस्सी.चे शिक्षण घेऊन दुग्ध व्यवसायात उडी घेत असल्याचे बघून, त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या क्रांतिकारी निर्णयाला कडाडून विरोध केला. मोठा भाऊ आणि बहिणी शिकून मोठे झालेले असताना, तू कशाला गावात राहून दुधाच्या धंद्यात थकतोय म्हणत त्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. पण हार मानेल तो योगेश कसला. त्याने तीन ते चार महिने घरच्यांशी वैचारिक भांडण केले आणि शेवटी त्यांचे मन वळविलेच. समाजाचा व गावाचा विचार त्याने कधीच केला नाही. त्याला सोबत फक्त त्याचे कुटुंब पाहिजे होते. म्हशी विकत घेण्यासाठी सुरुवातीला नातेवाईक व मित्र मंडळींचा त्याला खूप आधार मिळाला. जळगावच्या बळवंत नागरी सहकारी पतपेढीकडून कर्ज काढून सुमारे तीन हजार चौरस फुटाचे शेड त्याने गावालगत उभारले. आपला नाद पूर्ण करण्यासाठी धडपडत असताना गोठ्यातील म्हशींचे शेण उचलण्यापासून ते म्हशींच्या दुधाच्या धारा काढण्याचे सर्व काम करण्याची तयारी त्याने ठेवली.

उच्च शिक्षणाचा दुग्ध व्यवसायात असा झाला उपयोग

योगेशच्या गोठ्यात सध्या मुऱ्हा व अन्य जातीच्या आठ म्हशी आहेत. त्यांच्यापासून त्याला दोन्ही वेळचे 60 लिटर दूध उत्पादन सध्या मिळते आहे. याशिवाय गावातील अन्य पशुपालकांचे 150 लिटर दूध संकलन तो करतो. 01 डिसेंबरपासून जळगाव शहरात काचेच्या बाटल्यांमध्ये दूध वाटप तो करणार असून, ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवठा करण्याचे ध्येय तो गाठणार आहे. विशेष म्हणजे उच्च शिक्षण घेऊन दुग्ध व्यवसाय करताना त्याने काही चांगले बदल केले असून, म्हशींचे ब्रीडींग तसेच फीडींग व मॅनेजमेंट या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. ब्रीडींगसाठी दर्जेदार सीमेन्सचा वापर करून गोठ्यात जातिवंत जनावरांची पैदास वाढविल्यानंतर आता फीडींगकडे त्याने लक्ष दिले आहे. तो दूध उत्पादन वाढीसाठी म्हशींना गोळी पेंड, विविध कडधान्याच्या चुनी पशुखाद्यात खाऊ घालतो. म्हशींना मक्याचा निकृष्ठ चारा कधीच खायला देत नाही. शेतात उत्पादीत झालेला रब्बी ज्वारीचा सकस चारा कुट्टी करून भरून ठेवतो. याशिवाय मेघा स्वीट व नेपियर गवताची लागवड शेतात करून ठेवली आहे. रोजचा खर्च आणि उत्पादन तसेच जनावरांचे प्रजनन, आरोग्य व्यवस्थापन याची नोंद असलेले रजिष्टर त्याने मेन्टेन ठेवले आहे. त्याची प्रगती पाहून गावातील लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलत असून, काही तरूण त्याचे अनुकरून करून दुग्ध व्यवसायात उतरले देखील आहेत.

संपर्क : योगेश पाटील, मो. 93590 42087

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : केळीला गुजरातच्या सुरत बाजार समितीत मिळतोय सध्या असा भाव
Next articleJalgaon News : जळगाव जिल्ह्यात शुक्रवारपासून पुढे आठवडाभर मध्यम ते हलका पाऊस पडण्याचा अंदाज