Success story | नाशिक जिल्ह्यातील ‘सह्याद्री फार्म्स’ने गेल्या वर्षभरात २४.५ हजार शेतकऱ्यांच्या ४०,००० एकर क्षेत्रावर उत्पादित झालेल्या तब्बल २,७५,३२७ मेट्रीक टन शेतीमालावर प्रक्रिया व निर्यात केली. त्यामाध्यमातून ‘सह्याद्री फार्म्स’ने केवळ निर्यातीतून सुमारे ३५२ कोटी रूपये उत्पन्न तर देशांतर्गत बाजारपेठेतून ६५५ कोटी रूपये उत्पन्न, अशा प्रकारे एकूण १००७ कोटी रूपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे. कंपनीचे २ हजार शेतकरी सभासद, संचालक व कर्मचारी यांचे अथक परिश्रम त्यामागे आहेत.
‘सह्याद्री फार्म्स’ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी कंपनीच्या प्रगतीपथावरील वाटचालीबाबतची माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे सह्याद्री फार्म्स ही द्राक्ष उत्पादन व निर्यातीतील तसेच टोमॅटो प्रक्रियेतील देशातील प्रथम क्रमांकाची कंपनी बनली आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ ही फलोत्पादन क्षेत्रातील महत्वाची भारतीय कंपनी म्हणूनही ओळखली जात आहे. द्राक्षाशिवाय डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, काजू, स्वीटकॉर्न या पिकातही सह्याद्री फार्म्स काम करीत आहे. विविध पिकांतील २४.५ हजार शेतकरी थेट कंपनीशी जोडले गेले आहेत. २०१२ मध्ये १३ कोटी उलाढाल असलेल्या ‘सह्याद्री फार्म्स’ने मार्च २०२३ अखेर उलाढालीचा १ हजार कोटीचा टप्पा पार केला. ‘सह्याद्री फार्म्स’ला जोडून अन्य ४८ शेतकरी उत्पादक कंपन्या संलग्न आहेत. त्यांच्यामार्फत विविध फलोत्पादन तसेच प्रक्रिया प्रकल्पांवर काम सुरु आहे.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/Untitled-114-jpg.webp)
‘सह्याद्री फार्म्स’ची यशोशिखराकडील वाटचाल
स्वच्छ- स्पष्ट व्हिजन, सदहेतू, पारदर्शकता, प्रश्नाच्या मूळापर्यंत जाऊन दीर्घ धोरण आखणे व त्याची वेगाने अंमलबजावणी करणे, कार्यक्षमता वाढविणे, मनुष्यबळ विकास, कृतीशीलता, नेतृत्व, उद्योजकीय मानसिकता, उत्पादनांची निवड, शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया, एकात्मिक मूल्य साखळी,
प्रिमियम बाजारपेठेची निवड, प्रिमियम बाजारपेठेत टिकण्यासाठीचा दर्जा, भांडवल उभारणी व भांडवलाचा परिणामकारक वापर, पायाभूत सुविधांची उभारणी, तंत्रज्ञान, महिलांचा शेतीतील सहभाग अशा बऱ्याच गोष्टींच्या जोरावर ‘सह्याद्री फार्म्स’ची यशोशिखराकडे वाटचाल सुरु आहे. १ हजार कोटींचा टप्पा शेतकऱ्यांच्या मालकीच्या या कंपनीने पार पाडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांत एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सुमारे १३०० पूर्णवेळ आणि ४ हजार हंगामी कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही कंपनीला मोठे यश आले आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ने गेल्या वर्षभरात सुमारे १,५०,२०० टन टोमॅटो प्रक्रिया केली. याशिवाय ४८,७०६ टन द्राक्षे, २६,२८० टन आंब्याची, २४,१०४ टन केळी, ५,३०० टन स्वीट कॉर्न, २०,००० टन इतर फळांवर प्रक्रिया केली.
ग्रामीण भागातील ध्येयनिष्ठ युवा शेतकऱ्यांना मिळेल प्रेरणा
फलोत्पादनातील मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मागील 12 वर्षांच्या वाटचालीतून एक आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. देशाने दुग्ध क्षेत्रात उत्पादन व वितरणाच्या बाबतीत जशी जागतिक पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, आम्ही त्याच पध्दतीने फलोत्पादन क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेतीक्षेत्रात एकत्र येऊन निश्चित दिशा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्नांसह काम करायला वाव आहे. त्यातून महाराष्ट्रातील ग्रामीण ध्येयनिष्ठ युवा शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल याची खात्री वाटते, असे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी बोलून दाखविले.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)