रासायनिक खतांचा डोस निम्मे करूनही केळी उत्पादनात कशी झाली भरघोस वाढ ?

Success Story: रासायनिक खतांचा भरमसाठ वापर वाढल्याने आज सर्वदूर जमिनीचे आरोग्य बिघडले असून, सुपिक शेतीची नापिकीकडे वाटचाल सुरू झाली आहे. अशा या परिस्थितीत रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी करून फक्त सेंद्रिय खतांच्या जोरावर केळीचे भरघोस उत्पादन घेण्याची किमया करंज (ता. जि.जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी श्री. मोहनचंद नारायण सोनवणे यांनी करून दाखवली आहे.

How did banana production increase by reducing the dose of chemical fertilizers?

सन 1998 मध्ये शेतकरी मोहनचंद सोनवणे हे करंज गावाचे सरपंच होते. राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांचे त्यावेळी शेतीकडे भरपूर दुर्लक्ष झाले. केळीसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने खर्चाचे गणित बिघडले. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर सुद्धा वाढला. वडिल आरोग्य विभागात नोकरीला होते. मात्र, ते निवृत होण्याच्या मार्गावर असल्याने मुलास शेतीसाठी पैसे पुरवू शकत नव्हते. कोणी मित्र किंवा नातेवाईक देखील मदत करायला तयार नव्हते. मदतीचा हात पुढे करण्यापेक्षा तुम्हाला काय कमी आहे आणि तुम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच होते ना, असे टोमणे मारणारे कमी नव्हते. प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेले शेतकरी सोनवणे यांनी शेवटी ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून स्वतःला अलिप्त केले. त्यादिवसापासून शेतीवर लक्ष केंद्रित करून उत्पादन वाढीवर भर दिला.

सेंद्रिय शेतीची अशी मिळाली दिशा

दरम्यानच्या काळात शेतीसाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरण्याचा निर्धार केला. अभ्यासासाठी मोहन देशपांडे, सुभाष पाळेकरांची पुस्तके वाचली. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करण्याचा मुख्य उद्देश त्यांचा होता. अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी नंतरच्या काळात शेतातील वाया जाणारा किंवा जाळण्यात येणारा काडी कचरा शेतातच कुजविण्यावर भर दिला. परिणामी, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला व मातीचा पोत सुधारला. भुसभुशीत झालेल्या जमिनीत पेरलेले प्रत्येक पीक जोमदार बहरू लागले. त्यामुळे शेतकरी सोनवणे यांना रासायनिक खतांचा डोस जवळपास निम्म्याने कमी करता आला. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढविल्याने केळीच्या उत्पादनात घट न येता उलट आणखी वाढ झाल्याचा अनुभव त्यांना आला. पुढे जाऊन खोड पद्धतीने केळी लागवड न करता त्यांनी जळगाव येथील जैन इरिगेशनच्या जी-9 जातीच्या टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड करण्यास सुरुवात केली. उत्पादन खर्च कमी होऊन शेतीपासून मिळणाऱ्या नफ्यात आपोआपच वाढ झाली.

पशुधनामुळे सेंद्रिय निविष्ठा निर्मितीला चालना

शेतकरी मोहनचंद सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीवर भर देत असताना, घराशेजारील गोठ्यात गाई व म्हशींचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांना दुग्ध उत्पादनासोबत शेणखत व गोमूत्र मुबलक प्रमाणात मिळू लागले. त्याचा वापर करून तयार केलेल्या जीवामृताचा त्यांनी शेतीत प्रयोग करण्यास सुरुवात केली. तसे केल्याने शेतात गांडुळांची संख्या तर वाढलीच रासायनिक खतांमुळे मृतावस्थेत गेलेली शेती पुन्हा जीवंत झाली. जमिनीचा टणकपणा कमी झाल्याने कमी अश्वश्क्तीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत होऊ लागली. इंधनाचा खर्च कमी झाला. रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करूनही पूर्वी जेमतेम 10-12 किलोचे घड मिळायचे, तिथे आता सेंद्रिय खतांचा वाढविल्यानंतर 20-22 किलोपर्यंत वजनाचे केळी घड मिळू लागले आहेत.

सेंद्रिय शेतीमुळे झाली भरभराट

शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शाश्वत कमाई शेतीतून होऊ लागल्यानंतर शेतकरी सोनवणे यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार एकदाचा कमी झाला. हातात पैसा शिल्लक राहू लागल्यानंतर त्यांनी मुलगा व मुलगी यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून बाहेर गावी पाठविले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शेवटी त्यांची मुलगी बीई काॅम्प्युटरचे शिक्षण घेऊन पुढे गेली. तर मुलगा एमबीबीएसची पदवी घेऊन एमएसचे शिक्षण घेण्यासाठी शहरात गेला.

संपर्क : श्री. मोहनचंद सोनवणे, मो. 97647 69614

WhatsApp Group
Previous articleज्वारी, बाजरी, मक्याची किमान आधारभूत किंमतीने 01 डिसेंबरपासून सुरू होणार खरेदी
Next articleभडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, पाचोरा, जळगावच्या शेतकऱ्यांना 3.25 कोटींची भरपाई